Eknath Shinde Live Update : ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता लोकांमध्ये जाऊन दाखवा: उद्धव ठाकरे

Eknath Shinde Latest Marathi News
Eknath Shinde Latest News, CM Uddhav Thackeray Latest News
Eknath Shinde Latest News, CM Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama

एकनाथ शिंदे काही वेळापूर्वी ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती पुढे आली आहे. दिल्लीला जाऊन ते भाजप पक्ष श्रेष्ठींशी सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सेना चालवायला लायक नसेल तर बाळासाहेबांचा फोटो काढून टाका. मी बाळासासहेबांचा मुलगा आहे हे विसरून जा. मी वर्षा बंगला सोडला म्हणजे जिद्द सोडली असं नाही. पण ज्यांना आपण मोठं केलं त्यांची स्वप्न मोठी झाली ती मी पुर्ण करु शकलो नाही. वर्षा की मातोश्री असं झोपेतही विचारलं तरी माझं उत्तर मातोश्री असंच असेल. असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

''मी मुख्यमंत्री पदासाठी योग्य नसेल तर सांगा मी पद सोडायला तयार आहे. एकनाथ शिंदेंसाठी मी काय कमी केलं, त्यांना नगरविकास खातं दिलं. अनेकदा एकनाथ शिंदेंना त्यांच्या नाराजीबाबत विचारलं, संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप होऊनही त्यांना सांभाळून घेतलं. पण आता ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता लोकांमध्ये जाऊन दाखवा.हे सर्व भाजपने केलं आहे, आता त्यांची आग्र्याहून सुटका करावी लागेल.'' अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. " कुटूंबप्रमुखाला धोका देता याचं वाईट वाटलं.पण आता शिवसेनेचा पहिला नारळ फुटला अशी परिस्थिती आहे, असं समजा.पण आता मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे हे विसरून जा आणि शिवसेना पुढे न्या.शिवसेनेची मुळं माझ्यासोबत जे गेले ते कधीच माझे नव्हते.''

आणखी पाच आमदारांवर अपात्रतेचे संकट

शिवसेनेकडून बंडखोर गटातील आणखी पाच आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी विधानसभेेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमुळकर, बालाजी किणीकर, रमेश बोरनारे यांची नावं अपात्र करण्यासाठी देण्यात आली आहेत. याआधी शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह बारा आमदारांवर कारवाई करण्याची मागणी झिरवळ यांच्याकडे केली होती.

शिंदे गट आजच मोठा निर्णय घेणार

गुवाहाटीत असलेल्या शिंदे गटाकडून आजच मोठं पाऊल उचललं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गटाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र पाठवणार असल्याचे समजते. यामध्ये त्यांच्याकडून आपल्या गटाला मान्यता देण्याची मागणी केली जाऊ शकते. शिंदे यांच्याकडे 40 हून अधिक आमदार आहेत. त्यामुळे त्यांचाच गट शिवसेनेचा अधिकृत असल्याचा दावा केला जाणार आहे. तसं झाल्यास राज्यपाल आणि उपाध्यक्ष काय निर्णय घेणार, कोणते कायदेशीर पेच निर्माण होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

एकनाथ शिंदे हॉटेलमधून बाहेर पडले

बंडखोर आमदारांचा ठिय्या असलेल्या गुवाहाटीतील रेडिसन हॉटेलमधून एकनाथ शिंदे काही वेळापूर्वीच बाहेर पडल्याचे समजते. ते विमानतळाकडे रवाना झाले असून मुंबईकडे निघणार असल्याचे समजते. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिंदे यांच्या गटातील इतर आमदार मात्र हॉटेलमध्येच आहेत.

नरहरी झिरवळ यांच्याकडून एकनाथ शिंदेंना धक्का

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांनाच मान्यता दिली आहे. तर शिंदे यांनी केलेला आपण गटनेता असल्याचा आणि अजय गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती केल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावल्याचे समजते. त्यामुळे आता यावर शिंदे गट काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. झिरवळ यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. झिरवळ यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे गटाने केलेला ठराव संशयास्पद असल्याची भूमिका मांडली होती. त्यानंतर त्यांनी चौधरी आणि पभू यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे संजय राऊत व अनिल देसाई यांच्यातील बैठक संपली आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी शिंदे गटाची वेळ आता निघून गेल्याचे म्हटले आहे. हम हार मानने वाले नहीं, असं म्हणत राऊतांनी शिंदे गटाला आता उघडपणे आव्हान दिलं आहे. सभागृहासह रस्त्यावरची लढाईही आम्ही जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत जवळपास 40 हून अधिक आमदार फोडले आहेत. आणखी काही आमदार त्यांच्या गटात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण आता शिंदे गटाने पक्षामध्ये उभी फूट पाडण्याची तयारी केल्याचे समजते.त्यादृष्टीने माजी आमदार राजेश क्षीरसागर हेही गुवाहाटीत दाखल झाले असून त्यांच्याप्रमाणेच इतर माजी आमदार व खासदारांशी संपर्क साधला जात आहे. तसेच नगरसेवक, तालुका प्रमुख, जिल्हाप्रमुखांना गळाला लावण्याचे प्रयत्नही सुरू आहे. ठाण्यातील बहुतेक नगरसेवकांनी शिंदे यांना समर्थन दिल्याचे समजते. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील काही पदाधिकारीही शिंदे यांच्या गटात जाऊ शकतात. शिंदे यांच्याकडून पक्षात उभी फूट पाडल्यास त्यांना पक्षाचे अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह मिळू शकतो. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता शिवसेना हा पक्षच ताब्यात घेण्याच्यादृष्टीने त्यांनी पावले टाकली आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ आता संपली आहे. शिवसेनेतील बहुतेक आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील. शिंदे आणि भाजपचे सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात येईल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. 

राज्याचे कृषी मंत्री दादा भूसे हे गुवाहाटीमध्ये आहेत. ते गुरूवारीच एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. पण सध्याचा काळ शेतकऱ्यांचा महत्वाचा आहे. भूसे हेच राज्यात नसल्याने शेतकरी वाऱ्यावर असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. 'खरीप हंगामात कृषी मंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊस कमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या,' असं राऊतांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहे. वाय. बी. सेंटरमध्ये दोघांची बैठक सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर गुरूवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पवारांना घरी जाऊ देणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राणेंवर टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू. अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल. पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही, असं ट्विट राऊतांनी केलं आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. ते राजभवनात परतल्यानंतर सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येऊ शकतो. 

देवेंद्र फडणवीस आता मुंबईत आले असून त्यांच्या सागर बंगल्यामध्ये भाजपची खलबतं सुरू आहेत. यामध्ये सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुरूवारीच दिल्लीत दाखल झाले होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्याचे समजते. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यास पर्यायी सरकार देण्याबाबत या बैठकांमध्ये एकमत झाल्याचे समजते. सरकार स्थापन करताना कोणते कायदेशीर अडचणी येऊ शकतात, याबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली जात असल्याचे समजते.

एकनाथ शिंदे गटाचीही आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सत्तेबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे ते आता माघार घेणार नाहीत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता शिंदे नेमका काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी बारा वाजता राज्यातील जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत किती जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार, यावर शिवसेनेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. कारण सध्या केवळ आमदारांनी बंडखोरी केली असून संघटन पातळीवर सध्यातरी बंडकोरी उफाळून आलेली नाही. 

शिवसेनेचे आमदार उदयसिंह राजपूतही नॉट रिचेबल आहेत. गुरूवारी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत राजपूत उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. पण त्यानंतर आता तेही नॉट रिचेबल असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

आमदार दिलीप लांडेही गुवाहाटीत दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील कट्टर समर्थक आमदार दिलीप लांडे हेही गुवाहाटीत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेचे मुंबईतील कट्टर शिलेदारही एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊ लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर हे दोघे शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. दिलीप लांडे हे काल रात्रीपर्यंत ठाकरे मुंबईतच असल्याचे सांगितले जात होते. लांडे हेही शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याने त्यांच्या ताकद आणखी वाढली आहे. शिंदे यांच्याकडील एकूण आमदारांचा आकडा आता जवळपास पन्नासवर पोहचला आहे.

राज्यातील सत्तापरिवतर्नाबाबत काहीही माहिती नसल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. प्रस्ताव आल्यास कोअर कमिटीमध्ये निर्णय घेतला जाईल. मी जी भूमिका मांडेन ती पक्षाची अधिकृत भूमिका असेल, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मोहित कंबोज यांचे एकनाथ शिंदे हे मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्याबाबत माहिती नाही. संजय राऊत हेच शिवसेना संपवत असल्याचे मी यापूर्वीही बोललो आहे. ते सकाळी एक बोलतात आणि नंतर दुसरे, याचा फटका शिवसेनेलाच बसला असल्याचेही पाटील म्हणाले.

ज्या दिवशी बंडखोर आमदार मुंबईत येतील, त्यादिवशी त्यांच्या निष्ठेची, बाळासाहेबांवरील भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागणार आहे. सभागृहात हा विषय येईल तेव्हा महाविकास आघाडीच्या बाजूने आमदारांचा कौल असेल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sarkarnama News
sarkarnama.esakal.com