शिंदे समर्थक खासदार लोकसभेत वेगळी चूल मांडणार? : मोठी माहिती समोर

Eknath Shinde | Loksabha | Shivsena MP : संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे.
Shrikant Shinde | Eknath Shinde
Shrikant Shinde | Eknath Shinde Sarkarnama

नवी दिल्ली : महाराष्ट्रात तब्बल ४० आमदारांच्या सहाय्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात वेगळा गट तयार झाल्यानंतर शिवसेनेमध्ये (Shivsena) पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर संसदेमध्येही शिंदे समर्थक खासदारांचा वेगळा गट बनणार असण्याची चर्चा आहे. मात्र, पावसाळी अधिवेशन तीन दिवसांवर राहिले असतानाही अद्याप या मुद्द्यावर लोकसभा सचिवालयाशी कोणीही संपर्क साधलेला नसल्याची माहिती उच्चपदस्थ सुत्रांनी दिली आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. याच दिवशी राष्ट्रपतिपदाची निवडणुकही आहे. या दोन्हीही गोष्टींसाठी शिवसेनेचे खासदार दिल्लीत दाखल होणार आहेत. शिवसेनेचे लोकसभेत १९ तर राज्यसभेत तीन खासदार आहेत.

महाराष्ट्रात ४० आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे आता भाजपच्या सहकार्याने मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता काही खासदारांमध्येही अस्वस्थता असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेनेचे बहुतांश खासदार, उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाशी आणि भाजपशी जुळवून घ्यावे या मताचे आहेत. शिवाय बहुतांश खासदारांनी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती, त्यानुसार शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र त्यानंतर देखील शिवसेनेचे डझनभर आपल्या खासदार संपर्कात असल्याचे सत्ताधारी भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे.

दरम्यान, शिवसेनेचे काही खासदार संसदेत उघडपणे वेगळा गट स्थापन करावा या मताचेही असल्याचे बोलले जात आहे आणि या खासदारांच्या अशा बैठका झाल्याच्या ही बातम्या माध्यमांमधून झळकल्या आहेत. तसेच हे खासदार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांनाही भेटले असल्याचे वृत्त माध्यमांमधून झळकले होते.

त्यामुळेच संसदेत विशेषतः लोकसभेत शिवसेनेचा एकनाथ शिंदे समर्थक खासदारांचा वेगळा गट तयार होवून हा गट संसदीय कार्यपद्धतीमध्ये वेगळ्या आसन व्यवस्थेची मागणी करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या सचिवालयाला विचारणा केली असता शिवसेनेकडून अथवा या पक्षाच्या खासदारांकडून वेगळा गट स्थापन करण्याबद्दल कोणतीही औपचारिक विचारणा अद्याप झालेली नाही असे संसदीय सचिवालयाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in