'गिरणी कामगारांना देशोधडीला लावणाऱ्यांची संगत सोडा'

गिरणी कामगारांच्या संपाचे उदाहरण देत संजय राऊतांनी (Sanjay Raut) एसटी संपावर (Strike) टिका केली होती.
'गिरणी कामगारांना देशोधडीला लावणाऱ्यांची संगत सोडा'

मुंबई : गिरणी कामगारांना देशोधडीला लावणाऱ्यांची संगत प्रथम सोडावी, असा टोला मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल देसाई (Sheetal Desai) यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) लगावला आहे. एसटी कामगारांचा गिरणी कामगार करताय का, असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. त्याला शीतल देसाई यांनी उत्तर दिले आहे.

दरम्यान, मुंबईत 1980 च्या दशकात झालेला गिरणी कामगारांचा संप अजूनही अधिकृतरित्या मागे घेण्यात आला नाही. मात्र यामुळे गिरण्या बंद पडल्या. बंद पडलेल्या गिरण्यांचा व्यवसाय मुंबईबाहेर गेला व गिरणीमालकांनी गिरण्यांची जागा विकून गडगंज नफा कमावला. या प्रक्रियेत संप ताणल्यामुळे गिरणी कामगार मात्र देशोधडीला लागले. या घटनांना उद्देशून राऊत यांनी केलेल्या एसटी संपावरुन टीका केली होती. त्याला देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'गिरणी कामगारांना देशोधडीला लावणाऱ्यांची संगत सोडा'
'गृहपाठ न केल्यामुळे पडळकर आणि खोत तोंडघशी पडले'

यावेळी बोलताना शीतल देसाई म्हणाल्या की, " गिरणी संप दीर्घकाळ चालला व त्यामुळे गिरण्या बंद पडून जमिनी विकता आल्याने एका अर्थाने गिरणीमालकांचे उखळ पांढरे झाले. मात्र कामगारनेते व मालक यांच्या लढाईत भरडल्या गेलेल्या गरीब गिरणी कामगारांचे भले करणे तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस सरकारला सहज शक्य होते. कामगारांना गिरण्यांच्या जागेवर घरे उभारून देणे सरकारला सहज शक्य होते. मात्र मुळात कायद्याचा चुकीचा अर्थ लावणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कागदी आदेशावर तोंडात मिठाची गुळणी धरून बसलेल्या तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांमुळे गिरणी कामगारांच्या हातात मातीच आली, अशी घणाघाती टीका देसाई यांनी यावेळी केली.

कोणताही वरिष्ठ अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या संमतीशिवाय असे वाटेल ते आदेश काढूच शकत नाही, हे सत्य आहे. तो आदेश रद्द करण्याचे धाडसही तेव्हाच्या सरकारमध्ये नव्हते. या आदेशाला सरकारचाच मूक पाठिंबा असल्याने अखेर न्यायालयातही कामगारांना यश मिळाले नाही व ते कामगार देशोधडीला लागले. हा इतिहास राऊत एवढ्या लौकर विसरले हे आश्चर्यकारक आहे. अर्थात गिरणी कामगारांना देशोधडीला लावणाऱ्यांची संगत आता शिवसेना सत्तेसाठी करीत आहे, हे आश्चर्यकारक मुळीच नाही, असेही देसाई यांनी म्हटले आहे.

अजूनही उरलेसुरले गिरणी कामगार घरांसाठी म्हाडाचे उंबरठे झिजवीत आहेत. गिरणगावाच्या परिसरातच पत्रकार म्हणून राऊत यांची कारकीर्द घडली आहे. त्यामुळे या सर्व घडामोडींचे ते देखील साक्षीदार आहेतच. मात्र आता ते वाईट साथीदारांबरोबर असल्याने गिरणी कामगारांचे दुःख त्यांना समजत नाही, अशी खोचक टिकाही देसाई यांनी यावेळी केली.

त्याचबरोबर गिरणी कामगारांचे दाखले देताना राऊत यांना काही दुःख होत असेल असे वाटत नाही. पण त्यांना दुःख होत असेल तर गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी अजूनही त्यांनी धडपड करावी. तसेच एसटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली लेखणी आणि वाणी झिजवावी, अशा शब्दांत देसाई यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in