राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कंट्रोल नको : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले.
राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कंट्रोल नको : शरद पवार
Sharad PawarSarkarnama

उदगीर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी पवारांनी साहित्य आणि राजकारणात (Politics) अतूट संबंध असल्याचे सांगत साहित्यिकांनी राज्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ नये. राज्यकर्ते कोणतेही उपकार करत नाहीत, ते त्यांचे कर्तव्य आहे, असं आवाहन केलं. त्याचप्रमाणे राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कंट्रोल असू नये, असं सूचक वक्तव्यही पवारांनी केलं.

साहित्य संमलेनाच्या उद्घघाटनानंतर बोलताना पवारांनी साहित्य आणि राजकारणावर विशेष भाष्य केलं. सध्या राज्यात जेम्स लेन यांच्या शिवाजी महाराजांविषयीच्या पुस्तकावर वाद निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर पवारांनी हे भाष्य केलं आहे. पवार म्हणाले, लेखक-विचारवंत विद्याधर गोखले यांनी म्हटले आहे की, लोकाश्रयापेक्षा राजाश्रयाच्या हत्तीवरील अंबारीत जर आम्ही साहित्य शारदेला बसवू लागलो तर ‘अमृतातेहि पैजा जिंके’ असे बोल तिच्या वीणेतून कसे उमटतील? थोडक्यात साहित्यिकांच्या हाती राजकर्त्यांवर अंकुश हवा पण राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कण्ट्रोल असू नये.

Sharad Pawar
उदगीरमध्ये जमला साहित्याचा मेळा

साहित्य रसिकांना विनंती...

माझी साहित्य रसिकांना विनंती आहे की, आपल्या सहकार्याशिवाय साहित्यरथ धावणार नाही. साहित्यरथाची लोकाश्रय आणि राजाश्रय ही दोन चाके आहेत असे मी मानतो. प्राचीन इतिहासात डोकावले की लक्षात येते की, विक्रमादित्य, हर्षवर्धन, यशोवर्मन आदी राजांच्या पदरी अनुक्रमे कालिदास, बाणभट्ट, भवभूती अशी श्रेष्ठ रत्ने होती. छत्रपती शिवरायांच्या दरबारी कवी भूषण, संभाजीराजांच्या पदरी मित्र कवी कलश अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. अगदी मुस्लीम राज्यकर्त्यांनी देखील भारतीय कलाकारांना दरबारी आश्रय दिला. अल्लाऊद्दीन खिल्जी, सम्राट अकबर ही त्यातील काही उदाहरणे आहेत. पण राजाश्रय असलेल्या कवी-लेखकांना व्यवस्थेला आव्हान करणारे लिखाण करण्यावर मर्यादा येत.

साहित्यिक अंगाने त्यांचे साहित्य उच्चकोटीतील आहे यात शंका नाही. परंतु समाजव्यवस्था बदलण्याइतकी धार त्यांच्या लेखणीत नसे. त्यांची लेखणी सार्वभौम व स्वायत्त नसते. लेखक-विचारवंत श्री. विद्याधर गोखले यांनी म्हटले आहे की, लोकाश्रयापेक्षा राजाश्रयाच्या हत्तीवरील अंबारीत जर आम्ही साहित्य शारदेला बसवू लागलो तर ‘अमृतातेहि पैजा जिंके’ असे बोल तिच्या वीणेतून कसे उमटतील? थोडक्यात साहित्यिकांच्या हाती राजकर्त्यांवर अंकुश हवा पण राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कण्ट्रोल असू नये, असं पवार यांनी नमूद केलं.

साहित्यिकांनी राज्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ नये

साहित्य आणि राजकारण यांचा तसा अतूट संबंध आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, यशवंतराव चव्हाण हे उत्तम साहित्यिक होते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर लोकशाही राज्यव्यवस्था स्थापित झाल्यावर अभिव्यक्ती, प्रसारमाध्यमं अथवा साहित्य हा लोकशाहीचा चौथा स्तंभ गणला गेला. राज्यकर्त्यांकडून त्याला राजाश्रय मिळाला. हा आश्रय ग्रंथ प्रकाशनास प्रोत्साहन, साहित्यिकांना निवासे, मानधन-पुरस्कार या रूपाने दिला जाऊ लागला आणि आजही दिला जात आहे. अगदी विधिमंडळाचे सदस्य करणे, पद्म पुरस्कारासाठी निवड करणे येथपर्यंत साहित्यिकांना प्रोत्साहन दिले जाते.

Sharad Pawar
'शरद पवार यांनी लक्ष घातले तर उदगीर जिल्हा होऊ शकतो'

मला वाटते की, आश्रयदात्यांनी ह्या प्रोत्साहन आणि मदतीचा उपयोग आपल्या कौतुकासाठी अथवा स्वार्थासाठी करू नये. मला वाटतं लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे. तो जिवंत राहावयास हवा. लेखन सार्वभौम आणि स्वतंत्र हवं. दुर्गा भागवत म्हणतात की लेखन मेलं तर विचार मेला आणि विचार मेला की संस्कृतीचा क्षय होऊन विकृती जन्माला येते. जगाच्या इतिहासाकडे पाहिले तर एक लक्षात येते की, राजे-राज्यकर्त्ये जातात पण ग्रंथ चीरकाल राहतात. लेखणीतून क्रांती घडली आहे. त्यामुळे साहित्यिकांनी राज्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ नये. राज्यकर्ते कोणतेही उपकार करत नाहीत, ते त्यांचे कर्तव्य आहे.

साहित्यिक आणि राज्यकर्त्यांमध्ये स्नेहभावाचे नाते असावे

साहित्यिकांमध्ये आणि राज्यकर्त्यांमध्ये परस्पर समन्वयाचे आणि स्नेहभावाचे नाते असावे असे मला वाटते. प्रस्तुत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. भारत सासणे हे लोकशाहीच्या कार्यकारी मंडळ स्तंभात एक सनदी अधिकारी होते. त्यामुळे शासन आणि साहित्यिक यांमधील समन्वय आणि स्नेहभाव वृद्धिंगत होत राहील याचे आशादायी चित्र मला दिसते. मी देखील अनेक वर्षे लोकशाहीच्या पहिल्या स्तंभाचे प्रतिनिधित्व करतो आहे. माझा देखील साहित्यिकांशी स्नेहभाव कायम राहिला. ‘साहित्य म्हणजे प्रेम, जे माणसांना जोडते !’ इतकी सोपी व्याख्या मधु मंगेश कर्णिकांनी केली आहे. मला ती खूप भावते. साहित्यिकांकडून मला खूप मोलाच्या सूचना मिळतात. मी त्यांकडे गांभीर्याने पाहतो.

पवारांनी भाषणात मांडलेले इतर मुद्दे -

हे संमेलन मराठवाडयातील उदगीर ह्या ऐतिहासिक नगरीत होत आहे याचा मला विशेष आनंद आहे. निज़ाम आणि रझाकारांच्या जुलमी राजवटीत मराठी अस्मिता टिकवून ठेवणाऱ्या या शहराचा तुम्हा-आम्हाला अभिमान आहे. ४० वे मराठवाडा साहित्य संमेलन देखील ह्याच नगरीत झाले होते. मराठवाडा हा मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्याचा आधारवड आहे असे कौतिकराव ठाले पाटील अभिमानाने सांगतात. मराठवाडा साहित्य परिषदेची स्थापना १९४३ साली झाली. तरी त्यापूर्वी पासून साहित्य चळवळ मराठवाडयात सुरू होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी वाड्म़य विभाग सुरू झाल्यावर अनेक साहित्यिक घडले. ज्येष्ठ समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी, डॉ. यु. म. पठाण, अनंत भालेराव, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. गो. मा. पवार, डॉ. गंगाधर पानतावणे, ना. धों. महानोर, नरहर कुरूंदकर, फ. मु. शिंदे, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. जनार्दन वाघमारे, लक्ष्मीकांत तांबोळी, दासू वैद्य, कादंबरीकार नरेंद्र नाईक अशा अनेक नामवंत साहित्यिकांनी मराठवाड्यात वाड्म़यीन चळवळ पुढे नेली.

साहित्य संमेलने दरवर्षी भरवली जातात आणि गेल्या काही वर्षांपासून अपवादाने एखादे संमेलन सोडल्यास माझी ह्या संमेलनांमध्ये हजेरी ही ठरलेली असतेच. हा प्रघात असाच चालू राहिला तर उद्घाटक म्हणून सर्वाधिक वेळा मान मिळाल्याचा एखादा वेगळा विक्रम माझ्या नावे प्रस्थापित व्हायचा. विनोदाचा भाग सोडला तर एक नक्की की मला साहित्य, कला , क्रीडा प्रकारांची आवड आहे. सार्वजनिक जीवनात सतत व्यग्र असलो तरी पुस्तक वाचनाचा छंद मी जोपासला आहे. पुस्तकांचा संग्रह करणे मला आवडते. इतकी पुस्तके संग्रही आहेत की, मला पुस्तक भेट देणाऱ्याने बऱ्याचदा माझ्या पुस्तकांच्या कपाटात दाखल झालेले पुस्तकच पुन्हा दिलेले असते. मला व्यग्रतेमुळे पुस्तक पूर्णत्वाने कधी-कधी वाचता येत नाही. परंतु मी ते चाळून त्यातील आशय आत्मसात करतो. पुस्तकाचे सार लक्षात आले तरी ते मला संदर्भासाठी उपयोगी पडते, असं पवारांनी सांगितलं.

माझ्या संग्रही असणाऱ्या पुस्तकांकडे पाहिले असता मला जाणवते की, साहित्यातून काव्य कमी होत चाललंय. गेल्या वर्षी मी नाशिक येथील साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली. भेट धावती असली तरी माझी नजर दुकानांच्या कप्प्यांमधल्या पुस्तकांचा वेध घेत होती. पुस्तकांमध्ये मला नव्याने प्रकाशित झालेले काव्यसंग्रह फारसे दिसलेच नाहीत. ग.दि.मा., कुसुमाग्रजांचा मी चाहता असल्याने ती उणीव मला प्रकर्षाने जाणवली. काव्यसंग्रह असतीलही, परंतु प्रमुख प्रकाशन संस्था छापण्यासाठी पुढे येत नसाव्यात. काव्यसंग्रह प्रकाशनाच्या अर्थकारणाचं गणित जुळत नसावं असा माझा तर्क आहे. परंतु एकूणच ग्रंथ प्रकाशनाची व्यावसायिक बाजू फारशी उत्साहवर्धक नसावी. नवे तंत्रज्ञान म्हणा, बदललेल्या सवयी म्हणा, परभाषेचे आक्रमण म्हणा, मनोरंजनाच्या साधनांची रेलचेल म्हणा, मराठी शिक्षणाकडे कमी होत चाललेला ओढा म्हणा, ग्रंथ प्रकाशन संस्थांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. हे चित्र निराशाजनक आहे. ते बदलणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली.

पवार पुढे बोलताना म्हणाले, साहित्यविश्वासमोर हे आव्हान काही नवे नाही. ११ मे १८७८ रोजी न्या. महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी अर्थात गोपाळ हरी देशमुख यांनी पहिले ग्रंथकार संमेलन या नावाने साहित्य संमेलन भरवले. त्यावेळी देखील ग्रंथकारांसाठी पुस्तक प्रकाशन जिकीरीचे होते. त्यामुळे हे संमेलन प्रामुख्याने ग्रंथकारांना ग्रंथ प्रसिद्ध करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्या माध्यमातून विद्येचा लाभ बहुतांशी समाजास व्हावा ह्या हेतूने भरवले गेले. त्यात दरसाल किमान पाच रूपयांचे ग्रंथ विकत घेणारे सहा हजार वाचक तयार व्हावेत असे आवाहन देखील करण्यात आले होते. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास त्याकाळी राजाश्रय नव्हता आणि लोकाश्रयाशिवाय नवनवीन साहित्य प्रकाशित होणे जिकीरीचे होते.

साहित्याची ताकद खऱ्या अर्थाने फ्रेंच राज्यक्रांतीवेळी दिसून आली. फ्रेंच राज्यक्रांतीमुळे जगाला समजले की, लेखणी ही क्रांतीची मशाल होऊ शकते. रूसो, व्हॉल्टेअर यांच्या तत्वज्ञानाने क्रांतीचा परिपोष केला, सामान्यांनी वर्गव्यवस्था लाथाडली आणि सोळाव्या लुईची जुलमी राजवट उलथवली. यावरून एक बोध घेता येतो की, हस्तिदंती मनोऱ्यातील साहित्यात सामर्थ्य नसते तर ते समाजाभिमुख असले तरच त्यात शक्ती येते.

मराठी साहित्याबाबत बोलायचे झाले तर दुसऱ्या बाजीरावाच्या काळात साहित्याला अवकळा आली. त्यानंतर ब्रिटीश राज्यकर्त्यांनी नोकर निर्माण करण्यासाठी शिक्षणाला मोकळीक दिली परंतु साहित्यावर अनेक बंधने लादली. विष्णूशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, स्वातंत्र्यवीर सावरकरकृत मॅझिनीचे चरित्र, खाडीलकरांची भाऊबंदकी व कीचकवध नाटक यांवर ब्रिटिशांनी बंदी आणली. त्यामुळे१८७८ साली न्या. रानडे आणि लोकहितवादी यांनी संमेलन भरवण्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल तसे क्रांतिकारक होते. कारण संमेलनाच्या दोन महिन्यांपूर्वी ब्रिटीश राज्यकर्त्यांनी देशी वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करणारा व्हर्न्याक्युलर प्रेस कायदा पास केला होता. त्याला ह्या दोघांनी एकप्रकारे आव्हानच दिले होते, असं पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.