शरद पवार मातब्बर, महाआघाडीचा वापर राष्ट्रवादीच्या वाढीसाठी : फडणविसांची कबुली - Sharad Pawar toll leader he use grand alliance for the growth of NCP says adnavis | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवार मातब्बर, महाआघाडीचा वापर राष्ट्रवादीच्या वाढीसाठी : फडणविसांची कबुली

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

पवारांच्या डोक्यात पक्षवाढीचा विचार 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वात जास्त नुकसान हे महाराष्ट्रातील जनतेचे झाले आहे. शरद पवार अत्यंत मातब्बर नेते आहेत. या संपूर्ण महाआघाडीचा उपयोग आपला पक्ष कसा वाढवायचा, याचा ते योग्य पद्धतीने वापर करीत आहेत, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला.

मुंबई येथे भाजपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये शरद पवार यांची भूमिका कशी आहे, याविषयी त्यांनी भाष्य करताना पवार केवळ त्यांच्या पक्षवाढीचा विचार करीत असल्याचा आरोप केला.

फडणवीस म्हणाले, की एक वर्षात हे सरकार अपयशी झाले आहे. कुठल्याही घटकाचे समाधान करू शकले नाही. तिनही पक्षात समन्वय नाही. विजेच्या प्रश्नात केलेले घुमजाव ऐतिहासिक आहे. एकूणच सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. बदल्यांचे दलाल आज फिरत आहेत. अशी अवस्था पूर्वीच्या 15 वर्षाच्या काळातही नाही पाहिली. कुठलाच कारभार या सरकारमध्ये होत नाही. त्यामुळे एक वर्षाच्या निमित्ताने अपयशी ठरलेल्या सरकारला व मुख्यमंत्र्यांना ऐवढेच सांगेन की मुख्यमंत्र्यांसारखे वागा. संगम बोलण्यात व वागण्यात असावे. आम्ही विरोधी पक्ष आहोत. आम्हाला दिलेल्या भूमिकेचे नीट पालन करू. महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू. आमच्या कितीही तक्रारी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानाकडे केल्या, तरीही आम्ही रस्त्यावर उतरू, असे फडणवीस म्हणाले.

केंद्र सरकारचा निधी राज्याला पुरेसा मिळत नाही, याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, की राज्य सरकार आवश्यक पत्रव्यवहार करीत नाही. पत्र गेल्यानंतरच मदत मिळते. येथे ज्या मंत्र्यांच्या मनात येईल, ते तेच बोलतात. पत्राबाबत कधीच कोणी बोलत नाही. केंद्र सरकार निश्चित मदत करेल. केंद्राची पद्धत पहावी. केंद्र सरकार निधीसाठी मदत करेल, असे फडणवीस म्हणाले.

भाजपविषयी त्यांच्या मनात भीती

सरकारमधील तिनही पक्ष एकत्र एकत्र आले, तरीही शेवटी त्यांचे सरकार कसे चालले हे जनतेने पाहिले आहे. राजकारणात 1 आणि 1 दोनच होते, असे नाही, तर कधी शुन्यही होतो व कधी 11 ही होतात. ही अनैसर्गिक युती आहे. भाजपची यांच्या मनात ऐवढी भिती झाली, की त्यांना लहान निवडणुकाही एकत्र लढण्याची वेळ आली आहे.

घरगुती टीका नको

ईडी ही आपल्या कारवायानुसार कारवाया करतील. पुरावे नसताना कारवाई केल्यास न्यायालय येथेही त्यांना ठोकेल. आम्ही कधीही कोणाच्या घरच्यांवर टीका केली नाही. आम्ही संयम बाळगतो. माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे नेते काय बोलतात, काय लिहितात, ट्विटरवर काय टाकतात, हे सर्वांनी पाहिले. मी त्याचा कांगावा केला नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख