शिंदे बंडाला भाजपचा पाठिंबा, हे सांगण्यासाठी पवार थेट राष्ट्रीय पक्षांची यादीच घेवून आले

Shivsena | Eknath Shinde |NCP | Sharad Pawar : शरद पवारांनी अजित पवारांचा दावा खोडून काढला...
शिंदे बंडाला भाजपचा पाठिंबा, हे सांगण्यासाठी पवार थेट राष्ट्रीय पक्षांची यादीच घेवून आले
NCP | Sharad Pawar Sarkarnama

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामागे अजून भाजपचा रोल दिसत नाही. सध्याच्या परिस्थिती कोणताही भाजपचा मोठा नेता तिथे दिसून येत नाही, असे म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला सत्ता संघर्षाच्या नाट्यातून क्लिनचीट देवून टाकली. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मिडीयावर राष्ट्रवादी काँग्रेसचा या वक्तव्यामागे काही वेगळा डाव आहे का? भविष्यात सोबत जाण्याची वेळ आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपसोबत संबंध खराब होवू नये म्हणून असे म्हणतं आहेत का? असा सवाल विचारण्यात येत आहे.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दावा खोडून काढला आहे. आज संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद म्हणाले, शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली यामागे भाजप नाही असे आमच्या सहकाऱ्यांनी सांगितले. मात्र मला तसे वाटत नाही. आमच्या सहकाऱ्यांना स्थानिक परिस्थिती जरूर माहीत आहे. मात्र गुजरात आणि आसाम मधली परिस्थिती मला अधिक माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांनी आताच एका व्हिडीओमध्ये सांगितले की, त्यांना एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे. माझ्याकडे देशातील सर्व पक्षांची यादी आहे. या यादीत देशात सहा अधिकृत राष्ट्रीय पक्ष आहेत. भाजप, काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, बसपा आणि राष्ट्रवादी असे सहा पक्ष आहेत. यात काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी शिंदे यांना मदत करायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे उरलेला राष्ट्रीय पक्ष कोणता ते सर्वांना माहीत आहे असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, सूरत आणि आसाममध्ये बंडखोर आमदारांची व्यवस्था करणारे जे लोक दिसले, ते अजित पवार यांच्या परिचयाचे नाहीत, ते माझ्या परिचयाचे आहेत. सूरतमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील हे मराठी गृहस्थ आहेत. ते संसदेचे सदस्य असल्यामुळे मी त्यांना ओळखतो. त्यांचा सूरतमधील व्यवस्था करण्यात सहभाग असेल तर याचा अर्थ काय समजायचा? आसाममध्ये संबंध व्यवस्था तिथल्या राज्य सरकारने केली. आसाम राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना मदत करणारे राज्यातील कोणी दिसत नसले तरी तिथे कोण काय करतंय हे सर्वांना दिसत आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील :

शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावेच लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यानंतर मला वाटत नाही की त्यांना आसाम आणि गुजरातचे नेते इथे येऊन मार्गदर्शन करतील. तसेच तिथे गेलेल्या आमदारांनी घेतलेला निकाल पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघात देखील त्याची प्रतिक्रिया उमटेल, त्यामुळेच आपल्या मतदारसंघातील लोकांना काहीतरी सांगावे, यासाठी निधी मिळत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत असेही शरद पवार यांनी सांगितले.

शिवसैनिक त्यांना पुन्हा निवडून देत नाहीत :

ज्यावेळी छगन भुजबळ हे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले तेव्हा त्यांच्यासोबत बारा ते सोळा लोक आले होते. जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा एक सोडून इतर सर्वांचा पराभव झाला. हा पूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे ही स्थिती जे लोक आसाममध्ये गेले आहेत, त्यांच्यासोबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या लोकांना काहीतरी सांगावे म्हणून निधीचा विषय काढला गेला, बाकी त्याला काही अर्थ नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in