राऊतांनी सोमय्यांना डिवचले, टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवट लावा सांगत असेल तर...

Sanjay Raut | Kirit Somaiya| दुसऱ्याच्या घरात घुसून परिस्थिती बिघडवणार असाल तर गुन्हा दाखल होणारच
राऊतांनी सोमय्यांना डिवचले, टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवट लावा सांगत असेल तर...
Sanjay Raut | Kirit Somaiya| Sarkarnama

मुंबई : “महाराष्ट्रात जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ओळखतात, जे खासदार शरद पवारांना ओळखतात त्यांना हे कळेल, इतके लोकशाहीवादी सरकार संपूर्ण देशात नसेल. आता विरोधकावंर हल्ले म्हणजे काय…कोणी एखादा माथेफिरु, वेडा स्वत:वर हल्ला झाला, हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि असा टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवट लावा सांगत असेल तर त्याच्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे,” असं सांगत संजय राऊतांनी (Sanjay Raut) किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) निशाणा साधला.

याचवेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडवणीस यांच्या भूमिकेवरही निशाणा साधला आहे. “देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत. हनुमान चालिसा म्हटली म्हणून कोणावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही. ते वकील आहेत. मुंबई हायकोर्टाने याबाबत दिलेला आदेश त्यांनी वाचला पाहिजे. त्यांचेही मन अशांत असल्याने त्यांनी घरात जाऊन हनुमान चालिसा वाचली पाहिजे. दुसऱ्याच्या घरात घुसून परिस्थिती बिघडवणार असाल तर गुन्हा दाखल होणार,” असे संजय राऊतांनी सांगितले.

Sanjay Raut | Kirit Somaiya|
संजय राऊत राणांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याचा दावा करतात, ते प्रकरण नेमकं काय आहे?

“महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जर लोकशाहीची इतकी चिंता आहे तर त्यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करु आणि त्यांनी भूमिका व्यक्त केली आहे ती फक्त महाराष्ट्रापुरती नसून राष्ट्रीय स्तरावरची असू शकते. कारण संपूर्ण देशात हुकुमशाही निर्माण झाली आहे का, अशी चिंता सर्वांनी व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला असेल. आम्ही त्यांच्याशी बोलू,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. परत सत्तेत येऊ शकले नाहीत याची फडणवीसांना अस्वस्थता असून पुढील २५ वर्ष पुन्हा येण्याची सुतराम शक्यताही नाही. त्यांचे मन अशांत असेल तर त्यांनी आपल्या देवघरात हनुमान चालिसा वाचून मन शांत करावं,” असा सल्लाही संजय राऊतांनी भाजपा नेत्यांना दिला.

भाजपचे नेते लोकशाही विषयी प्रवचनं झोडत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. कालच शरद पवार यांच एक वक्तव्य ऐकले, सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकले नाही, येण्याची प्रबळ इच्छाही होती. पण सत्तेत न आल्याने जी अस्वस्थता आहे त्यातून विरोधी पक्षाच्या लाऊडस्पीकरमधून वक्तव्यं बाहेर पडत आहेत, असं सांगितलं आहे. पण आज देशात कोणत्या प्रकारचं वातावरण आहे, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या ज्या पद्धतीने वापर केला जातो, न्यायालयांवर दबाव आणला जातो, विरोधी पक्ष अनेक राज्यांमध्ये कशाप्रकारे दहशतीखाली आहे यासंदर्भात, मानवी हक्कांसंदर्भात जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे ते कोणत्या हिटलशाहीविषयी बोलत आहेत हे समजून घ्यावं लागेल,” असं संजय राऊत म्हणाले.

“मी कालच सांगितलं गेल्या तीन महिन्यात उत्तर प्रदेशात १७ खून आणि बलात्कार झाले आहेत. हिटलरशाही, हुकूमशाही, कायदा सुव्यवस्था कोसळणं काय आहे हे आपण पाहायला पाहिजे. आसाम सरकारने गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांना अटक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत ट्वीट केल्याप्रकरणी अटक करुन सुटका कल्यानंतर पुन्हा अटक केली आणि वारंवार अटक केली, मग हे नेमकं कोणत्या लोकशाहीचं लक्षण आहे, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे. यावरही फडणवीसांनी मनमोकळं बोललं पाहिजे. आम्ही त्यांच्या भावना समजावून घेऊ. कारण त्यांना ही लोकशाहीची उबळ आली आहे ती राष्ट्राच्या हिताची आहे”. असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना जशास तसं उत्तर देण्यास सांगितलं आहे, असा प्रश्न विचरताच संजय राऊत म्हणाले की, ''भाजपाने जशास तसे उत्तर दिलंच पाहिजे. जर या देशात कोणी लोकशाहीवर, विरोधकांवर हल्ला करत असेल तर प्रत्येकाने जशाच तसे उत्तर देऊन लोकशाहीचे रक्षण करायला पाहिजे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना काही चुकीची माहिती दिली तर मी त्यांच्याकडे योग्य माहिती पाठवतो. देशात अनेक ठिकाणी विरोधकांवर हल्ले होत आहेत, तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. त्यामुळे याविरोधात राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.