रियाचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी समोर आलेल्या ड्रग्ज अँगलची चौकशी एनसीबी करीत आहे. या प्रकरणी दररोज नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
rhea chakrabortys judicial custody extended till 6 october by ndps court
rhea chakrabortys judicial custody extended till 6 october by ndps court

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली होती. या दोघांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने एनसीबीने आज त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. त्यामुळे रिया आणि शौविकचा कारागृहातील मुक्कात 6 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे.  

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी या आठवड्यात बोलावण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रियावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने म्हटले होते. 

रियाला एनसीबीने 6 सप्टेंबरला अटक केली होती. तेव्हापासून न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. ती सध्या भायखळा कारागृहात आहे. आता तिची न्यायालयीन कोठडीची मुदत वाढविण्यात आल्याने तिचा कारागृहातील मुक्कामही वाढला आहे. रिया आणि शौविक यांच्या वतीने त्यांचे वकील सतिश मानेशिंदे यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले आहेत. यावर उद्या सुनावणी होणार आहे. 

रिया चक्रवर्तीच्या चौकशीत तिने बॉलीवूडमधील कलाकारांची नावे उघड केली आहेत. यात अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, राकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना या आठवड्याच्या अखेरीस चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. यात काही वृत्तवाहिन्या आता दीपिका पदुकोणचेही नाव घेऊ लागल्या आहेत. बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. 

निर्माता मधू मँटेना, टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि श्रुती मोदी यांची उद्या पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. याचबरोबर सेलिब्रेटी मॅनेजर करिष्मा प्रकाश आणि केडब्लूएएन टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपकर यांनाही उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, करिष्मा प्रकाश हिने तब्येत बरी नसल्याचे कारण देऊन चौकशीला हजर होण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती. दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com