तळोजा कारागृहातून सुटका झाली अन् अर्णब गोस्वामी म्हणाले... - republic tv editor arnab goswami released from taloja jail tonight | Politics Marathi News - Sarkarnama

तळोजा कारागृहातून सुटका झाली अन् अर्णब गोस्वामी म्हणाले...

वृत्तसंस्था
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरू आहे. त्यांनी आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर त्यांची सुटका झाली आहे.  

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी हे तळोजा तुरुंगात होते. गोस्वामी यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला आहे. तळोजा कारागृहातून आज रात्री गोस्वामी यांची अखेर सुटका झाली. 

गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून 4 नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. 

गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर निर्णय दिला. उच्च न्यायालयाने गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान, गोस्वामी यांनी अलिबाग सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावर अलिबाग न्यायालयाला चार दिवसांत निर्णय देण्याचेही उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. 

आता याप्रकरणी गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत गोस्वामी यांची तातडीने सुटका होईल हे पाहण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले होते. आज सर्वोच्च न्यायालयात गोस्वामींच्या बाजून हरीश साळवे यांनी तर महाराष्ट्र सरकारच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. 

गोस्वामी यांची आज रात्री तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. तास दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर गोस्वामी यांची सुटका झाली आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर गोस्वामी यांनी मोटारीत बसून सर्वांना विजयाची खूण केली. ते म्हणाले की, हा भारतीय नागरिकांचा विजय आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचा ऋणी आहे. भारत माता की जय! 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. आता पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख