महाडिक-पवारांच्या भांडणात भाजपकडून काॅंग्रेसच्या प्रतापगढींचा 'गेम' होणार?
Dhananjay Mahadik | Imran Pratapgadhi | Sanjay Pawar Sarkarnama

महाडिक-पवारांच्या भांडणात भाजपकडून काॅंग्रेसच्या प्रतापगढींचा 'गेम' होणार?

BJP | Congress : भाजपसाठी काँग्रेसचा पेपर तुलनेने सोपा आणि जास्त फायदा देणारा?

मुंबई : राज्यात राज्यसभा निवडणुकीत सहा जागांसाठी सात अर्ज आल्यामुळे आणि कोणीही माघार न घेतल्यामुळे तब्बल २४ वर्षांनंतर मतदान होणार आहे. १० जून रोजी हे मतदान होणार असून त्याचदिवशी मतमोजणी देखील होणार आहे. त्यावेळी नेमका कोणाचा पराभव होणार याचे अंदाज बांधले जात आहेत. विधानसभेतील उमेदवारांचे संख्याबळ आणि विजयाचा कोटा असा आकड्यांचा खेळ त्यादिवशी रंगणार हे स्पष्ट आहे. (Rajya Sabha Election Latest News)

याच आकड्यांच्या खेळात सध्या भाजपचे (BJP) दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (Shivsena) यांचा प्रत्येकी एक हे सुरक्षितपणे राज्यसभेत जातील असे चित्र आहे. पण खरी लढाई भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यामधील सहाव्या जागेसाठी होणार आहे. यात धनंजय महाडिक आणि संजय पवार हे कोल्हापूरचे दोन मल्ल मैदानात असणार आहेत. या सहाव्या जागेवरील विजयासाठी सध्यातरी आकड्यांच्या खेळात महाविकास आघाडी पुढे दिसत आहे. पण भाजपने महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेल्या छोट्या पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांच्या संपर्काला सुरुवात केली आहे.

मात्र त्याचवेळी भाजपने आणखी एक डाव टाकला असल्याची माहिती आहे. या डावात शिवसेनेचे संजय पवार आणि धनंजय महाडिक हे दोघेही विजयी होणार असून अपक्षांवर नेम लावत भाजप काँग्रेसचाच गेम करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचे ४४ आमदार असले तरी मंत्रिपद नाकारण्यात आल्याने अनेक आमदार नाराज आहेत. शिवाय महाविकास आघाडीत देखील सातत्याने काँग्रेसवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी काँग्रेसचे जेष्ठ नेते करत असतात. अशातच काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने इम्रान प्रतापगढी या बाहेरच्या उमेदवाराला लादल्याने पक्षात अस्वस्थता आहे आणि ती आशिष देशमुख यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनी उघड बोलून देखील दाखवली आहे. (Rajya Sabha Election Latest News)

याच अस्वस्थतेमधून काँग्रेसचे काही आमदार वेगळी भूमिका घेण्याचे सुतोवाच भाजपच्या गोटातून केले जात आहे. यातून भाजपला देखील फायदा आहे. भाजपचा उमेदवार निवडून येणार हे तर स्पष्ट आहेच, पण त्याशिवाय राज्यसभेत काँग्रेसचे संख्याबळ कमी करणे हे भाजपचे उद्दिष्ट आहे. काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाल्यास सहाजिक महाविकास आघाडीत वाद वाढेल. या पराभवाचे सारे खापर काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादीवर फोडेल आणि भाजपला हेच हवे आहे. शिवसेनेपेक्षा काँग्रेसचा उमेदवार पराभूत होणे आमच्यासाठी अधिक सोयीचे ठरेल, असे भाजपकडून सांगण्यात येते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in