Rajya Sabha : कोणते आमदार फुटले ? परब, देसाईंवरचा विश्वास ठाकरेंना नडला

अपक्षांच्या मतांची जबाबदारी परिवहन मंत्री अनिल परब आणि खासदार अनिल देसाई यांच्यावर सोपवली होती. त्यांची रणनीती फसल्याचे बोलले जात आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : फोडाफोडी टाळण्यासाठी चार दिवस आधीच आमदारांना हॉटेलमध्ये ठेवूनही नेमके कोणते आमदार फुटले, असा प्रश्न शिवसेना (shivsena) नेतृत्वाला पडला आहे. दगाबाज आमदारांवरून महाविकास आघाडीतील घटकपक्षांऐवजी शिवसेनेतच वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

अपक्षांच्या मतांची जबाबदारी परिवहन मंत्री अनिल परब आणि खासदार अनिल देसाई यांच्यावर सोपवली होती. त्यांची रणनीती फसल्याचे बोलले जात आहे. या दोघांनी अपक्षांसोबतच्या बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांना लांब ठेवल्याचेही सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, शिंदे आणि नार्वेकरांनी एकूण पाच मते शाबूत ठेवण्याचा दावा करण्यात येत आहेत. परंतु, परब आणि देसाईंनी आठ अपक्षांसोबत वरवरची चर्चा करून गाफील राहिल्यानेच पहाटेच्या मतमोजणीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाच 'गेम' झाल्याचे विश्लेषण शिवसेना नेतेच करीत आहे.

Uddhav Thackeray
आघाडीची मतं फुटली नाहीत, फडणवीसांनी विविध मार्गांनी माणसं वळवली : शरद पवार

राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहाव्या जागेसाठी स्वत: ठाकरेंनी ताकद लावूनही या निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार हरले. विधानसभेतील विरोधी देवेंद्र फडणवीस यांच्या चालीने लढलेले भाजपचे धनंजय महाडिक जिंकले. महाडिक आणि पवारांमधील मतांचा फरक पाहता आघाडीचे दहा मते फुटल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हा धोका टाळण्याच्या हेतुने शिवसेनेने स्वपक्षासह १३ अपक्ष आमदारांची मते सुरक्षित करण्याचा अटापिटा केला होता. त्यात शिंदे, परब, देसाई आणि नार्वेकरांकडे अपक्षांसोबत वाटाघाटी करून त्यांना आपल्याच बाजुने ठेवण्याचा आदेश होते. त्यानुसार आधी सहा जूनपासून आमदारांना आधी रिट्रीट आणि त्यांनी ट्रायडंटमध्ये ठेवले होते. तरीही भाजपच्या खेळीपासून सावध असलेल्या ठाकरेंनी स्वपक्ष आणि अपक्ष आमदारांना थोडेही डोळ्याआड होऊ दिले नव्हते. त्यामुळे सहाव्या जागेवर शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात होता.

अपक्षांशी जवळीक साधण्यात शिवसेनेला अपयश

प्रत्यक्ष निकालातून मात्र भलतेच आकडे पुढे आले आणि भाजपचे महाडिक खासदार झाले. या लढाईत महाविकास आघाडीची दहा मते फोडून बाजी मारण्यात भाजपला यश आले. मात्र, आघाडी सरकार, विशेषत: शिवसेनेला मोठा फटका बसल्याचे दिसते. त्यावरून थेट मुख्यमंत्री ठाकरेंच्या निवडणूक व्यूहरचनेवरच बोट ठेवले जात आहे. परंतु, मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आमदारांना सांभाळूनही त्यांच्या दगाफटका झाल्याने ठाकरेंसह सारेच शिवसेना नेते बुचकळ्यात पडले आहेत. त्यात अलीकडच्या काळात ठाकरेंच्या मर्जीतील मानले जाणारे परब आणि अनिल देसाई यांनी आठ अपक्ष आमदारांना गांभीर्याने घेतले नसल्याची नाराजी शिवसेनेत असल्याची चर्चा आहे. या मुद्यावरून शिवसेनेतील धूसफूस उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या काही बैठकांपासून शिंदे यांना लांब ठेवण्यात आले होते. एकूणच फडणवीसांच्या तुलनेत अपक्षांशी जवळीक साधण्यात शिवसेना तुर्त कमी पडल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com