'भोंगा' विषयाचा एकदा तुकडा पाडूया! राज ठाकरे यांचे आजारपणातही मनसैनिक आणि जनतेला पत्र

Raj Thackeray | MNS : "माझं एक पत्र पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा."
MNS Raj Thackeray Latest News in Marathi, MNS News
MNS Raj Thackeray Latest News in Marathi, MNS Newssarkarnama

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र अशा आजरपणाच्या काळात देखील त्यांनी 'भोंगा' हटाव आंदोलनाचा मुद्दा सोडलेला नसून याबाबत त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला पत्र लिहुन एकत्र येवून एकदाचा या विषयाचा तुकडा पाडूयाच, असे आवाहन केले आहे. तसेच हे पत्र मनसैनिकांनी प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या घरोघरी पोहचवण्याचे आदेशही राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आले आहेत.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मागील काही काळापासून मशिदींवरील भोंग्याच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. हे भोंगे हटवण्याची मागणी त्यांनी केली होती. तसेच भोंगे न हटवल्यास त्याच्यासमोर दुप्पट आवाज हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना (MNS) दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये आणि खबरदारीचा उपाय म्हणून मनसैनिकांना आणि पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आली होती. तसेच काही नेत्यांना ताब्यात देखील घेण्यात आले होते. (Raj Thackeray Latest News)

मात्र मनसेच्या या आंदोलनानंतर केवळ राज्यातच नाही तर देशभरातील वातावरण ढवळून निघाले. या आंदोलनाचे लोण उत्तर प्रदेशपर्यंत पोहचले होते. मात्र आता या विषयाचा कायमाचा तुकडा पाडयाच असा निश्चय राज ठाकरे यांनी केला आहे. यासाठी त्यांनी एक सविस्तर पत्र लिहून ते मनसैनिकांना पदाधिकाऱ्यांकडून घेण्यास सांगण्यात आले आहे. शिवाय लोकसहभागातून हा विषय लावून धरण्यास सांगितले आहे.

"तुम्ही एकच करायचं आहे, माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही." असा आदेश राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आहे.

राज ठाकरे यांनी पत्रात नेमकं काय म्हंटलं आहे?

महाराष्ट्रातील माझ्या बंधू, भगिनी आणि मातांनो,

सस्नेह जय महाराष्ट्र!

मशिदींवरील भोंगे काढण्यात यावेत ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती आणि भोंगे उतरवण्यासाठी चार मेचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच मशिदींवरचे भोंगे उतरले, पहाटेच्या अजान बंद झाल्या, दिवसभरातल्या बांगा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या नियमांनुसार कमी आवाजात होऊ लागल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ९२% मशिदींमध्ये मनसेच्या आंदोलनानंतर हा परिणाम दिसून आला.

भोंगे उतरवा ही मागणी काही नवीन नव्हे, स्वातंत्र्योत्तर काळात अनेकांनी ही मागणी केली, परंतु त्यावर कुणालाही उत्तर सापडले नाही. अनेकजण न्यायालयांत गेले. त्यावर काही उच्च न्यायालयांनी भोंग्यांविरोधात कारवाई करा असं सांगितलं. तर सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या त्रासाची दखल घेत डेसिबलची मर्यादा घातली. तरीही देशभरात भोग्यांचा धुमाकूळ सुरूच होता. अखेर, "लाऊडस्पीकरवरची तुमची अजान, बांग थांबली नाही तर आम्ही लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू" असं आम्ही ठणकावून सांगितल्यानंतर चित्र बदललं. सर्वात महत्वाचं म्हणजे, आमचा हा पर्याय समस्त हिंदू बांधवांना भगिनींना आवडला. म्हणून तर भोगे हटवा' विचाराचं लोण देशविदेशात पसरलं. त्यामुळेच राज्यातील, देशातील यंत्रणांना भोग्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली. त्याचा परिणामही आपल्या सर्वांना लगेच दिसून आला. उत्तरप्रदेशात योगींच्या सरकारनेही हजारो मशिदीवरचे भोंगे उतरवले.

माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी राज्यभरात असंख्य ठिकाणी आंदोलन केले. राज्य सरकारने माझ्या २८,००० महाराष्ट्र सैनिकांना नोटिसा बजावल्या, अनेकांना अटक केली, तर अनेकांना तडीपारी लावली. या देशाचं दुर्दैव हेच की, या देशात नियम मोडणात्यांना सर्व मोकळीक मिळते, परंतु नियम पाळण्याचा आग्रह धरणाऱ्यांना शिक्षा होते. असो. एक लक्षात घ्या, भोंगे हटवा' हे आंदोलन थांबलेलं नाही. आपणा सर्वांच्या आशीर्वादाने हे आंदोलन चालूच राहील. या आंदोलनाला तुमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभारही असायलाच हवा.

एक सुजाण नागरिक म्हणून पुढील सूचनांचे पालन आपण केले तर भोंग्यांचा हा प्रश्न आपल्याला कायमचा निकाली काढता येईल, तुम्हा काहीजणांना कदाचित ह्याचा थेट त्रास होत नसेलही, पण तुम्ही त्याबाबत इतरांनाही सांगू शकता.

Attachment
PDF
RAJ THACKERAY MARATRHI LETTER_220602_170838.pdf
Preview

१. सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरच्या आवाजाची सांगितलेली मर्यादा लोकवस्ती असलेल्या भागासाठी म्हणजे तुम्ही-आम्ही राहतो त्या परिसरासाठी जास्तीत जास्त ४५ ते ५५ डेसिबल (स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मिक्सरचा आवाज) इतकी आहे. तुमच्या घराजवळच्या लाऊडस्पीकरचा आवाज इतकाच असला पाहिजे. जिथे जिथे या नियमाचे पालन होत नसेल तिथे तिथे तुम्ही स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलीसांना कळवावे. लक्षात असू द्या की, तुम्ही जेव्हा अशा प्रकारची गोष्ट पोलिसांना कळवता तेव्हा तुम्ही लाऊडस्पीकरशी संबंधित लोकांविरोधात तक्रार करत नसता किंवा गुन्हा दाखल करत नसता. तुम्ही फक्त कळवत असता आणि संबंधितांवर राज्यशासनाच्या (State) वतीने पोलीस गुन्हा दाखल करत असतात आणि पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी पोलिसांचीच असते. तुम्ही कळवल्यानंतरही पोलिसांकडून कायद्याचे पालन झाले नाही तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर न्यायालयाचा अवमान (Contempt of Court) केल्याचा ठपका लागू शकतो.

२. लाऊडस्पीकरच्या आवाजाचा त्रास झाल्यास तुम्ही घरातूनच स्वतःच्या मोबाईलवरून १०० क्रमांक डायल करू पोलिसांना सतत माहिती देऊ शकता. पोलिसांना द्विटर आणि फेसबुकवर टॅग करूनही तुम्ही ही माहिती देऊ शकता. कोणत्याही प्रकारे तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली तर त्या तक्रारीची नोंद स्वतःकडे ठेवायला विसरू नका.

३. सर्वात महत्वाचं. माझं हे पत्र घेऊन तुमच्या घरी येणारा माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे, त्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. कोणत्याही संकटात, अडीअडचणीच्या वेळी माझा हा महाराष्ट्र सैनिकच तुमच्यासाठी धावून येईल.

आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाई, शेतकरी आत्महत्या, अपुऱ्या शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा अशा अनेक प्रश्नांमुळे गोंधळ उडालेला आहे. पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले भाव आणि महागाई यामुळे तर जनता होरपळली आहे. बेरोजगारीचा प्रश्न तर दिवसेंदिवस राक्षसीरूप धारण करताना दिसत आहे. हे सर्व प्रश्न गंभीर आहेतच; पण त्याचबरोबर आपल्या मानसिक आणि सामाजिक शांततेचा विषयही तितकाच महत्वाचा आहे, हे विसरून चालणार नाही. जसा हा भोग्यांचा विषय आपण सर्वांनी मिळून सोडवला तसेच हे इतर प्रश्नही आपण हातात हात घालून एकत्रितपणे सोडवू, असा मला विश्वास आहे.

एकदाचा या विषयाचा तुकडा पाडूनच टाकूया...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in