
मुंबई : पवारसाहेब हे जनसामान्यांमध्ये असणारे आणि जनसामान्यांमध्ये रमणारे नेते आहेत. त्यांना अशाप्रकारची जबाबदारी देऊन त्यांना कितपत पटेल हे माहित नाही. शेवटी याबाबतचा निर्णय पवारसाहेब आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबारला राष्ट्रवादी भवनमध्ये आले असता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवारसाहेब राष्ट्रपती पदासाठी इच्छुक आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत आपले मत स्पष्ट केले.
मागील दोन दिवसात देशातील काही वेबसाईट हॅक झाल्या आहेत हे सत्य आहे, असे सांगतानाच यासंदर्भात सायबर सेलचे प्रमुख मधुकर पांडे हे माहिती घेत आहेत. ठाण्याची वेबसाईटही हॅक झालीय परंतु महत्त्वाचा डाटा गेलेला नाही. समाजासमाजात जी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. हे कारण आहे त्याचाच हा परिणाम आहे. हॅकर्सने जगातील सर्व हॅकर्सना तुम्ही यामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन केले आहे.
वेबसाईट हॅक करण्यात आली ही वस्तुस्थिती आहे. याबाबत राज्यसरकारकडून आढावा घेण्यात आला आहे. त्यावर कोणत्या उपाययोजना करायच्या यासंदर्भात यंत्रणा माहिती घेत आहेत, असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले. आपल्या देशात समाजासमाजामध्ये विद्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे त्याला प्रतिकार म्हणून, प्रतिहल्ला म्हणून अशाप्रकारची कृती काही समाजातील टोकाचा विचार करणार्या लोकांकडून होत आहे. ही बाब बरोबर नाही.
शेवटी सगळ्यांना सलोख्याने रहायचं असेल तर एकमेकांच्या अडचणी व भावना समजून घेणे गरजेचे आहे.जे अपील केले जात आहे त्यामध्ये नुकसान सर्वांचे होणार आहे. त्यामुळे अशा गोष्टीपासून दूर रहावे असे आवाहनही दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केले. मुस्लिम समाजाबद्दल जे वक्तव्य करण्यात आले त्यासंदर्भात देशाच्या प्रमुखाने माफी मागावी ही मागणी आहे.
मात्र, पक्षाच्या प्रवक्त्याने जे उद्गार काढले त्यावरून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावर कारवाई सुरू आहे. आता याबाबत काय निर्णय घ्यायचा हे देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः ठरवावे असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले. मुस्लिम बहुल देशाकडून भारत तेल आयात करतो त्यामुळे त्याचा परिणाम होऊ शकतो का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता जागतिक व्यापाराचा आणि जागतिक नीतीचा हा भाग आहे.
आंतरराष्ट्रीय नीती ठरवण्याचे काम केंद्र सरकार करत असते. त्यामुळे केंद्र सरकार याची जरुर दखल घेईल, असे स्पष्ट मत दिलीप वळसे पाटील यांनी मांडले. नमाज पठणानंतर कुठलीही घटना होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व पोलिसांना सतर्क करण्यात आलेले आहे आणि सतर्क राहून कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राहिल याची काळजी पोलिस घेतील. ज्यापद्धतीने वक्तव्य आले त्याला प्रतिकार करण्यासाठी आज हा मेसेज दिला गेला आहे. अशाप्रकारची वक्तव्य होऊ नये. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या मर्यादा बाळगल्या पाहिजेत त्याचाच हा संदेश आहे, असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.