देशमुखांनंतर परमबीर सिंह यांचीही ईडीला हुलकावणी - Param Bir Singh has requested some more time to be present at the ED office | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

देशमुखांनंतर परमबीर सिंह यांचीही ईडीला हुलकावणी

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जुलै 2021

परमबीर सिंह यांनी देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले आहेत.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची ईडी (ED) कडून चौकशी केली जाणार आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचीही चौकशी सुरू असलेल्या प्रकरणातच परमबीर सिंह यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आले आहे. पण त्यांनी ईडीला हुलकावणी दिली असून चौकशीला हजर राहण्यासाठी मुदत मागितली आहे. त्यासाठी त्यांची तब्येतीचे कारण दिले आहे. (Param Bir Singh has requested some more time to be present at the ED office)

परमबीर सिंह यांनी देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले आहेत. बदली झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुखांवर हे आरोप केले. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेमार्फत देशमुखांनी 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिल्याचे या पत्रात म्हटलं आहे. सीबीआयने या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून ईडीकडूनही मनी लाँर्डिंगच्या आरोपाखाली देशमुख यांची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा : केंद्रीय मंत्री भारती पवार अॅक्शन मोडवर; कोरोना वाढलेल्या राज्यांत पाठवले तज्ज्ञ

देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना या प्रकरणात ईडीकडून अटक कऱण्यात आली आहे. तसेच देशमुख यांनाही तीनवेळा समन्स पाठवण्यात आले आहे. ईडीकडून देशमुख यांच्या मुंबई व नागपूरातील घरांची झाडाझडतीही घेण्यात आली आहे. देशमुख यांनी वय, आजार व कोरोनाचे कारण देत कार्यालयात उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. ऑनलाईन चौकशीसाठी तयार असल्याचे पत्र त्यांनी ईडीला दिले आहे. तसेच ईडीच्या कारवाईविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. 

देशमुख यांच्या भोवतीचा फास आवळत असतानाच आता ईडीकडून लेटरबॅाम्ब टाकणारे परमबीर सिंह यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना समन्स पाठवण्यात आले आहे. पण परमबीर सिंह यांनी ईडीला चौकशीसाठी मुदत मागितली आहे. आपली तब्येत ठीक नसून शस्त्रक्रियेसाठी वेळ हवा असल्याची विनंती केल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. 

दरम्यान, अनिल देशुख यांच्या भ्रष्टपद्धतीबाबत आपल्याला बळीचा बकरा बनविला गेले, असा आरोप परमबीरसिंह यांनी पत्रात केला आहे. परमबीरसिंह यांनी लिहिलेल्या आठ पानी पत्रांत गृहमंत्र्यांनी वाझेला बोलावून कसे हफ्ते गोळा करायला सांगितले, हे सविस्तर लिहिले होते. याबाबत झालेल्या बैठकांना गृहमंत्र्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे हे पण उपस्थित होते, असा उल्लेख परमबीर सिंह यांनी होता.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख