अशोक चव्हाणांच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या भिंगेना राष्ट्रवादीची संधी.. - Opportunity of NCP for bhinge the reason defeat of Ashok Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

अशोक चव्हाणांच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या भिंगेना राष्ट्रवादीची संधी..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

२०१९ मध्ये भिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून नांदेड लोकसभाननिवडणूक लढवली होती. काॅंग्रेसचे अशोक चव्हाण, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचितचे भिंगे अशी तिहेरी लढत या मतदारसंघात रंगली होती. भिंगे यांनी लक्षवेधी १ लाख ४४ हजार ५८६ मते मिळवल्यामुळे मत विभाजनाचा फायदा होऊन भाजपचे चिखलीकर यांनी येथून विजय मिळवला होता.

मुंबई ः  राज्यपाल नियुक्त बारा विधान परिषद सदस्यांच्या जागेसाठी महाविकास आघाडी सरकारने आपली  यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसने दिलेल्या यादीत नांदेड लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून लढलेले प्रा. यशवंत भिंगे यांचे नाव असल्याची माहिती आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून काॅंग्रेसचे अशोक चव्हाण पराभूत झाले होते. चव्हाणांच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या भिंगे यांना राष्ट्रवादीने संधी दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यपाल नियुक्त बारा जागांच्या यादीची चर्चा राज्यभरात सुरू होती. महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांच्या यादीतील संभाव्य नावांची चर्चा आणि अंदाज देखील मोठ्या प्रमाणात बांधले गेले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व राज्य सरकार यांच्याती तणावाचे संबंध पाहता राज्यपाल या नावांना मंजुरी देणार? की मग नियमांकडे बोट दाखव यादी फेटाळणार याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच आज महाविकास आघाडी सरकारने बारा जणांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली आहे.

या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून डॉ. प्रा.यशपाल भिंगे यांचे नाव असल्याचे समजते. २०१९ मध्ये भिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून नांदेड लोकसभाननिवडणूक लढवली होती. काॅंग्रेसचे अशोक चव्हाण, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचितचे भिंगे अशी तिहेरी लढत या मतदारसंघात रंगली होती. भिंगे यांनी लक्षवेधी १ लाख ४४ हजार ५८६ मते मिळवल्यामुळे मत विभाजनाचा फायदा होऊन भाजपचे चिखलीकर यांनी येथून विजय मिळवला होता. तर काॅंग्रेसच्या अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. ते तिसऱ्या क्रमांकावर राहीले.

त्यावेळी काँग्रेसची मते वंचितच्या उमेदवाराने घेतल्याने अशोक चव्हाणांचा पराभव झाला असे मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले होते. त्याच वंचितच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार की बहाल केली तर काँग्रेसची पर्यायाने अशोक चव्हाणांची नाराजी तर ओढवली जाणार नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख