कोरोनाच्या ओमिक्रोन व्हेरिएंटचे टेन्शन : मुंबई पालिका आयुक्तांच्या यंत्रणेला सूचना

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल (Dr. Iqbal Singh Chahal) यांनी यंत्रणेला सुचना दिल्या आहेत.
Corona
CoronaSarkarnama

मुंबई : कोरोना विषाणूचा अत्यंत वेगाने पसरणारा नवीन प्रकार (Corona Omicron Veriant) हा काही आफ्रिकन देशांमध्ये आढळला असून त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सर्वांना धोक्याचा इशारा दिलेला आहे. हे लक्षात घेता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai Airport) प्रशासन तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन व पोलिस (Mumbai Police) यंत्रणेने देखील आपापल्या स्तरावर आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, अशा सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल (Dr. Iqbal Singh Chahal) यांनी दिल्या आहेत.

Corona
आफ्रिकेतुन महाराष्ट्रात होणारी विमानसेवा बंद करा, आरोग्यमंत्र्याची केंद्राकडे मागणी

चहल म्हणाले की, ज्या आफ्रिकन देशांमध्ये नवीन कोविड विषाणू आढळला आहे, तेथून थेट किंवा अन्य हवाई मार्गाने आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबईत आला तर, त्यांचे पासपोर्ट काटेकोरपणे तपासावे. संबंधित प्रवाशांमध्ये संसर्गाची लक्षणाबाबत काटेकोर वैद्यकीय तपासणी करावी व त्याआधारे वैद्यकीय चाचणी देखील करावी. सध्याच्या पद्धतीनुसार त्यांना अलगीकरणाच्या सूचना द्याव्यात. जर, एखादा प्रवासी बाधित आढळला तर त्याला तातडीने संस्थात्मक विलगीकरण करावे, बाधित नमुन्यांचे जनुकीय गुणसूत्र (जीनोम स्क्विन्सिंग) पडताळावे. तसेच, बाधिताच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन पुढील कार्यवाही त्वरेने करावी, अशा सक्त सूचना चहल यांनी दिल्या आहेत. तसेच, या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या सूचना प्राप्त झाल्यास त्यानुसार पुढील निर्देश दिले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

कोरोना लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून मुंबईसह राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र, असे असताना जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगाला नुकताच धोक्याचा इशारा दिला आहे. काही आफ्रिकन देशांमध्ये कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळला असून तो अत्यंत संसर्गजन्य आहे, असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता २७ नोव्हेंबर) सकाळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांच्याशी चर्चा करून काही निर्देश दिले.

या पार्श्वभूमीवर डॉ. चहल यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात करण्यात आलेल्या बैठकीत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, सर्व सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्यासह पोलीस प्रशासनाचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, इतर पोलिस अधिकारी, विमानतळाचे अधिकारी, महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता, उपनगरीय रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, कार्यकारी आरोग्य अधिकारी आणि टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते. यावेळी कोरोना विषाणूचा ओमिक्रोन प्रकार व त्यावर काय खबरदारी घ्यावी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

Corona
मोठी बातमी : राज्यात आता २ डोस घेतलेल्यांनाच सार्वजनिक वाहनाने प्रवास करता येणार

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. चहल म्हणाले, आफ्रिकन देशांत कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यानंतर WHO ने दिलेला इशारा लक्षात घेता अनेक देशांनी व विमान कंपन्यांनी सावध पावले टाकली आहेत. त्याच धर्तीवर मुंबईत येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मागील पंधरा दिवसांच्या त्यांच्या प्रवासाची आवश्यक माहिती संकलित करावी. बाधित असलेल्या आफ्रिकन देशांमधून थेट मुंबईत येणारी विमाने नाहीत, ही तूर्तास दिलासादायक बाब असली तरी गाफील राहून मुळीच चालणार नाही. येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी स्वयंघोषणा पत्र देऊन मागील पंधरा दिवसातील आपल्या प्रवासाची माहिती देणे गरजेचे आहे. तसेच, त्यांचे पासपोर्ट विमानतळ अधिकाऱ्यांनी बारकाईने तपासावेत. व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि चाचणी आणि अलगीकरण अत्यंत काटेकोरपणे करावे. अशा सुचना दिल्या. केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचना लवकरच प्राप्त होणे अपेक्षित आहे. मात्र, दिलेल्या सुचना बद्दल महानगरपालिकेच्या वतीने निर्गमित करण्यात येतील व विमानतळावर व्यवस्था वाढवताना कोणतीही कमतरता राहणार नाही, या दृष्टीने सुसज्ज राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उभारण्यात आलेली सर्व जम्बो कोविड सेंटर योग्य क्षमतेने कार्यान्वित राहतील, यादृष्टीने त्यांची पुन्हा फेरपाहणी करावी. त्यामध्ये वैद्यकीय आणि इतर आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा, वैद्यकीय प्राणवायू निर्मिती व साठा, विद्युत व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था या सर्व बाबींचा आढावा घ्यावा, अशाही सूचना त्यांनी केल्या.

कोविड विषाणू संसर्ग पूर्णपणे संपलेला नाही, असे वारंवार सांगूनही बरेचसे नागरिक बेफिकीरपणे वावरत आहेत. योग्य प्रकारे मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने पुन्हा कडक कारवाई सुरू करावी. लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांनाच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्याबाबत भर दिला पाहिजे. विविध आस्थापना, दुकाने, मॉल, चित्रपट गृह अशा सार्वजनिक ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले नसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईचे करण्यास सांगितले. मुंबईमध्ये कोविड लसीची पहिली मात्रा देण्याचे लक्षांक पूर्ण केले तसे आता दुसरी मात्रा देण्याचे लक्ष देखील तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यत्रंणा सज्ज करण्याच्या दिल्या सुचना

कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या दिशेने सर्व विभागीय कार्यालयांनी वॉर्ड वॉर रूम पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी कोणत्या उपाययोजना नव्याने कराव्या लागतील, त्याचा आढावा घ्यावा. झोपडपट्टी व तत्सम भागांमध्ये सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये दिवसातून किमान पाच वेळा पूर्ण निर्जंतुकीकरण करावे. सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपायोजना करण्याच्या दृष्टीने पुन्हा तयारीला लागावे. रुग्णवाहिका व इतर वाहने उपलब्ध होतील, यासाठी पूर्व तयारी सुरू करावी आदी सूचना चहल यांनी केल्या. टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. संजय ओक यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com