स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुकमध्ये मुख्यमंत्री अन् केंद्रीय गृहमंत्र्यांचा उल्लेख का नाही? - ncp president sharad pawar writes letter to governor bhagat singh koshyari | Politics Marathi News - Sarkarnama

स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुकमध्ये मुख्यमंत्री अन् केंद्रीय गृहमंत्र्यांचा उल्लेख का नाही?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शरद पवार यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी राज्यपालांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला आहे. 

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेले ‘जनराज्यपाल – भगतसिंह कोश्यारी’ हे चित्ररुप कॉफी टेबल बुक शरद पवार यांना पाठवण्यात आले होते. या पुस्तकावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांना एक पत्र लिहिले आहे. शरद पवार यांनी पुणेरी टोमणे मारत लिहिलेल्या पत्रावरुन आता मोठी चर्चा सुरू झाली आहे. 

पवार यांनी या पुस्तकाच्या शीर्षकावरुनच राज्यपालांना चिमटा काढला आहे. महाराष्ट्र सरकारच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेले ‘जनराज्यपाल – भगतसिंह कोश्यारी’ हे चित्ररुप कॉफी टेबल बुक मिळाले. वास्तविक भारतीय संविधानात ‘जनराज्यपाल’ असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य सरकारच्या वतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे  स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद, अशा शब्दांत पवार यांनी टोमणा मारला आहे. पवारांनी या पुस्तकाचा स्वप्रसिद्ध असा उल्लेख करुन राज्यपालांना टोला लगावला आहे. 

कॉफी टेबल बुकचे अवलोकन केले असता त्यामध्ये आपल्या मर्यादित कालावधीतील एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी, स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ यांसारखे सोहळे, उच्चपदस्थ अभ्यागतांच्या – मान्यवरांच्या भेटीगाठी, इतर सामाजिक – सांस्कृतिक कार्यक्रम व त्यातील आपल्या सहभागाची छायाचित्रे पाहण्यात आली, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे. यातून पवारांनी राज्यपालांच्या एका वर्षात्या कारकिर्दीचा उपहासात्मक आढावा घेतला आहे.  

तसेच निधर्मवादासंदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही, असा टोला शरद पवार यांनी पत्रातून लगावला आहे. असो आपण आठवणीने पाठविलेल्या ऐतिहासिक कारकिर्दीचा लेखोजोखा पाठवला याबद्दल मी आपला आभारी आहे, असा टोमणाही पवार यांनी मारला आहे. 

राज्यातील मंदिरे सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. त्या पत्रात राज्यापालांनी मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. त्या पत्रावरुन मोठा गदारोळ झाला होता. राज्यात बार-रेस्टॉरंट सुरु झाले, मग देव कुलुपबंद का? तुम्हाला हिंदुत्वाचा विसर पडला आहे का? असे प्रश्न राज्यापालांनी विचारले होते. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उत्तर दिले होते. माझ्या हिंदुत्वाला  तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही. तसेच ते कुणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

अखेर या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांनीही राज्यपालांचे कान टोचले होते. याचा आधार घेत शरद पवारांनी राज्यपालांवर टीका केली होती. राज्यपाल हे देशातील महत्वाच्या आणि आदरणीय पदांपैकी एक पद आहे. त्या पदाचा आदर जसा राखला जातो, तसाच मुख्यमंत्री या पदाचाही राखला गेला पाहिजे. आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यानंतर राज्यपालांनी पदावर राहावं नाही हे ठरवाव, अशा शब्दांत शरद पवार यांनी कोश्यारी यांना सुनावले होते. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख