मेवाणींकडं जातीचं अस्सल सर्टिफिकेट, तरीही..! रोहित पवारांचा राणांना टोला

आपण मागासवर्गीय असल्याने पोलीस ठाण्यात आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही. वॉशरूमलाही जाऊ दिले नाही, असे गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.
मेवाणींकडं जातीचं अस्सल सर्टिफिकेट, तरीही..! रोहित पवारांचा राणांना टोला
Navneet Rana, Rohit PawarSarkarnama

मुंबई : आपण मागासवर्गीय असल्याने पोलीस ठाण्यात आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही. वॉशरूमलाही जाऊ दिले नाही, असे गंभीर आरोप खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला आहे. तसं पत्रंच त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Omprakash Birla) यांना एक पत्र लिहिले आहे. त्यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत राणांवर निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत राणांना लक्ष केलं आहे. मेवाणी यांना आसाम पोलिसांनी दोनदा अटक केली आहे. पहिल्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर त्यांना लगेच दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. पोलीस ठाण्यात महिला पोलिसाशी असभ्य वर्तन केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

Navneet Rana, Rohit Pawar
अखेर सत्य समोर! संजय पांडेंनी नवनीत राणांचा व्हिडीओ केला व्हायरल

राणा यांचा जातीचा दाखल्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यावरूनही राजकारण तापलं आहे. याअनुषंगाने रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, गुजरातमधील काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांना एकामागोमाग एक गुन्ह्यात अटक करुन भाजपकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय. त्यांच्याकडं जातीचं बोगस नाही तर अस्सल सर्टिफिकेट आहे, तरी त्यांनी ना जातीचं हत्यार बाहेर काढलं ना वॉशरुमला जाऊ न दिल्याची तक्रार केली. विचारधारेशी तडजोड नाही, असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संजय पांडेंकडून व्हिडीओ व्हायरल

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी याबाबत एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांचे आरोप खोटे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. हा व्हिडीओ खार पोलीस ठाण्यात असल्याचे सांगितले जात आहे. 'आम्हाला आणखी काय बोलण्याची गरज आहे का,' असंही पांडे यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पांडे यांनी यापेक्षा काहीही न लिहिता व्हिडीओतून पोलीसांनी कोणतीही चूक केली नसल्याचेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थेट संजय पांडे यांनीच हा व्हिडीओ ट्विट केल्याने त्याला महत्व प्राप्त झालं आहे.

पांडे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये राणा दाम्पत्य अत्यंत शांत वातावरणामध्ये चहा पित असल्याचे दिसत आहे. त्यांच्यासमोर पाण्याची बाटलीही दिसत आहे. तिथे कसलीही लगबग, गोंधळ दिसत नाही. इतरांसोबत चर्चा सुरू असल्याचे दिसते. पांडे यांनी हा व्हिडीओ ट्विट करत एकप्रकारे राणा यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषदेत या आरोपांना दुजोरा दिला होता. दरम्यान, सध्या रवी राणा व नवनीत राणा न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर 29 एप्रिल रोजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.