महाविकास आघाडीबाबत पवारांचं मोठं वक्तव्य; आगामी निवडणुकांबाबत मनातलं सांगितलं...
औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील चाळीस आमदारांनी केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिंदे गटाने आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली होती. पण त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आघाडीतच राहणे पसंत केले. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. (Shiv Sena Chief Sharad Pawar News)
औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलताना पवार यांनी 2024 च्या निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्रितच लढाव्यात, अशी आपली इच्छा असल्याचे सांगितले. त्यामुळे आगामी काळात राज्यात महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) कायम राहणार, अशी दाट शक्यता आहे. 2024 मध्ये तिन्ही पक्ष एकत्र लढावं, अशी माझी व्यक्तिगत मनस्थिती आहे. पण मी माझ्या पक्षात, काँग्रेस किंवा शिवसेनेशीही बोललो नाही. ती प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही, असंही पवारांनी स्पष्ट केलं.
मध्यावधी निवडणुका होतील, असं मी म्हणालोच नव्हतो, असं सांगत पवार म्हणाले, दोन-अडीच वर्ष राहिली आहेत, त्याच्या तयारीला आतापासूनच लागायला हवे. याचा अर्थ मध्यावधी निवडणुका नव्हे. प्रत्यक्ष निवडणुका येतात त्याआधी सहा महिने तयारी करावी लागते, असं मी म्हटले होते, असं पवारांनी स्पष्ट केलं.
बंडखोर आमदारांवर निशाणा
शिवसेनेतून बाहेर पडणारे म्हणतात, की राष्ट्रवादीमुळे बाहेर पडलो. त्यांना सांगण्यासाठी दुसरं कारण नाही. कुणी हिंदुत्व, कुणी राष्ट्रवादी, निधीचा विषय सांगत आहेत. त्यांच्या निर्णयाला काही आधार नाही. म्हणून काहीतरी स्पष्टीकरण करायचं म्हणून हे बोलले जात आहे. या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीचे मंत्री अधिक काम करतात, असं मी आघाडीतील अनेक आमदारांकडून ऐकलं आहे.
बंड केलेल्या आमदारांनी वेगळ्या कारणाने निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडे सक्षम कारणं नाहीत. शिवसेनेच्या मतदारसंघात चाचपणीचा कधी विचारही केला नाही. विधानसभेच्या निवडणुकीला एकत्र मिळून चर्चेची प्रक्रिया सुरू करावी, असा विचार केला होता, असंही पवारांनी स्पष्टपणे सांगितलं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.