करण जोहरच्या अडचणीत वाढ..धर्मा प्रॉडक्शनच्या कार्यकारी निर्मात्याला अटक - ncb arrests dharma productions executive producer kshitij prasad | Politics Marathi News - Sarkarnama

करण जोहरच्या अडचणीत वाढ..धर्मा प्रॉडक्शनच्या कार्यकारी निर्मात्याला अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्जच्या अँगलचा तपास एनसीबी करीत आहे. या प्रकरणी एनसीबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना एनसीबीने वेगाने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.  

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांच्यासह आणखी काही अभिनेत्रींची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना एनसीबीने वेगाने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. आता धर्मा प्रॉडक्शनच्या कार्यकारी निर्मात्याला या प्रकरणी अटक केल्याने निर्माता करण जोहर हा अडचणीत आला आहे. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी या आठवड्यात बोलावण्यात आले आहे. यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. 

बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. रकुल प्रीत सिंह काल चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर झाली. काल तिची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. दीपिका पदुकोणची व्यवस्थापिका करिष्मा प्रकाश हिचीही काल चौकशी झाली आहे. आज पुन्हा तिची चौकशी झाली आहे. दीपिका आणि करिष्मा यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे. दीपिकाची आज सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली. याचबरोबर सारा आणि श्रद्धा यांचीही चौकशी करण्यात आली.  

करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शनचा कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसाद या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एनसीबीने कालपासून त्याची चौकशी सुरू केली होती. तब्बल 24 तासांच्या चौकशीनंतर त्याला एनसीबीने आज अटक केली. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

एनसीबीच्या क्षितिजच्या घरावरही छापे टाकले होते. क्षितिजच्या चौकशीत त्याने दोन ड्रग्ज पुरवठादारांची नावे उघड केली आहेत. त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून तो ड्रग्ज पुरवठादारांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे. तो बॉलीवूडमधील कोणत्या कलाकारांना ड्रग्ज पुढे देत होता याची चौकशी एनसीबी करीत आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

एनसीबीने या प्रकरणी 24 सप्टेंबरला फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा आणि सुशांतची माजी व्यवस्थापिका श्रुती मोदी यांची चौकशी केली होती. त्याआधी जया साहा हिची सलग तीन दिवस चौकशी झाली होती. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख