अधिकाऱ्यांना मॅनेज करून झाले 'दाऊद'चे ज्ञानदेव!

नाव बदलण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल केल्याची माहिती मलिकांनी दिली.
अधिकाऱ्यांना मॅनेज करून झाले 'दाऊद'चे ज्ञानदेव!
Dnyandev and Sameer Wankhede Sarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शुक्रवारी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुंबई महापालिकेत नोंद असलेले दाऊद वानखेडे हे नाव बदलण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना मॅनेज केल्याचा दावा मलिकांनी केला आहे. त्यांनी नाव बदलण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल केल्याची माहिती मलिकांनी दिली.

मलिकांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. नाव बदलण्यासाठी 27 एप्रिल 1993 रोजी एक प्रतिज्ञापत्र महापालिकेत देण्यात आले. जीवन जोगुरे आणि अरूण चौधरी या दोघांनी हे प्रतिज्ञापत्र केले होते. दाऊद वानखेडे नाव नसून ज्ञानदेव वानखेडे हे नाव आहे, असे त्यात म्हटले होते. त्यावेळच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून नाव बदलण्यात आले. जन्मदाखल्यावर स्टार करून बाजूला ज्ञानदेव लिहिण्यात आले. त्याआधारे जन्मदाखला तयार करण्यात आला.

Dnyandev and Sameer Wankhede
मुंबईत वानखेडे चालवतात बार; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

दोन शाळेंच्या दाखल्यांवर दाऊद हेच नाव आहे. तसेच धर्मही मुस्लिम होते. पण शाळांचे रेकॉर्डही बदलण्यात आले. 1995 मध्ये मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला. ही बनावट कागदपत्रे दाखवून एससीचे जात प्रमाणपत्र घेतले. त्याआधारे महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर स्पर्धा परिक्षांमध्येही याअंतर्गतच सर्व फायदे घेतले. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली, असा आरोप मलिकांनी केला.

आता जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे हे प्रकरण आहे. त्यात सर्व समोर येईल. त्यांचे प्रमाणपत्र रद्द होऊन नोकरी जाईल, असे मलिकांनी सांगितले. दरम्यान, वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या मुंबईतील प्राथमिक शाळेचे दोन दाखले सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या दोन्ही दाखल्यांवर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद आणि धर्म मुस्लिम असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आणि वडिलांचे नाव दाऊद असल्याचा आरोप मलिक यांनी गुरूवारी केला होता.

समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी मलिक यांनी बुधवारी उच्च न्यायालयात (High Court) प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. वानखेडेंचा शाळेचा प्रवेश अर्ज आणि शाळा सोडल्याचा दाखला याचीही कागदपत्रे मलिक यांनी दिली आहेत. हे दाखले सोशल मीडियातही व्हायरल झाले आहेत. या दोन्ही कागदपत्रांमध्ये वानखेडे हे मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे.

Related Stories

No stories found.