मंत्री झाल्यानंतर राणेंच्या पहिल्याच कार्यक्रमात फडणवीस अन् शिवसेनेतील कट्टर विरोधकही - Narayan Rane and Devendra Fadnvis attend program with Shiv Sena leaders | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्री झाल्यानंतर राणेंच्या पहिल्याच कार्यक्रमात फडणवीस अन् शिवसेनेतील कट्टर विरोधकही

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 जुलै 2021

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नारायण राणे यांना सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रिपद मिळाले आहे.

मुंबई : शिवसेनेला कायम पाण्यात पाहत आव्हान देण्याची भाषा करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आज पहिलाच कार्यक्रम कोकणात झाला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांना दिल्लीतच थांबण्याचे आदेश दिल्याने राणेंनी व्हिडीओ कॅान्फरन्सद्वारे हजेरी लावली. या कार्यक्रमात राणेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेले खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) अन् दिपक केसरकर (Deepak Kesarkar) हे थेट आमदार नितेश राणेंसोबत व्यासपीठावर होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही व्हिडीओ कॅान्फरन्सद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (Narayan Rane and Devendra Fadnvis attend program with Shiv Sena leaders)

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नारायण राणे यांना सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रिपद मिळाले आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारत कामाला सुरूवातही केली. त्यानंतर त्यांचा पहिलाच कार्यक्रम रविवारी झाला. संसदेचे अधिवेशन लवकरच सुरू होणार असल्याने पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राणे या कार्यक्रमाला कोकणात येऊ शकले नाहीत. पण त्यांनी व्हिडीओ कॅान्फरन्सद्वारे हजेरी लावत उपस्थितींना मार्गदर्शन केले. 

हेही वाचा : पदोन्नतीसाठी बनवला न्यायालयाचा बनावट आदेश; आयएएस अधिकाऱ्याला अटक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले नगर परिषदेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नितेश राणे यांनी चक्क कोकण व महाराष्ट्राच्या विकासासाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी दर्शवली. विनायक राऊत अन् दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत राणे यांनी केलेलं हे वक्तव्य, नारायण राणेंचा मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिलाच कार्यक्रम, देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असे अनेक योगायोग रविवारी जुळून आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

नारायण राणे यांच्यासह नितेश व निलेश राणे यांच्याकडून सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विनायक राऊत व दिपक केसरकर यांच्यावर टीका केली जाते. अनेकदा राऊत व केसरकर यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून इशारे दिले जातात. शिवसेनेच्या नेत्यांकडून राणेंवर सतत निशाणा साधला जातो. एकमेकांना राजकारणातून संपवण्याची भाषा केली जाते. त्यावरून अनेकदा राणे समर्थक व शिवसैनिक आमनेसामने आले आहेत. अत्यंत टोकाची भूमिका घेत एकमेकांवर टीकास्त्र सोडणारे नेते एकाच कार्यक्रमात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम होता. देवेंद्र फडणवीस यांनीच याची आठवण करून देत राणेंना शुभेच्छा दिल्या. तसेच कोकणच्या विकासाला राणे गती देतील, असेही ते म्हणाले. विनायक राऊत व्यासपीठावर असल्याने ते व नितेश राणें यांच्यामध्ये राजकीय कलगितुरा रंगणार अशी अपेक्षा उपस्थितांना होती, पण तसे काहीच घडले नाही. 

नितेश राणे यांनी आपल्या भाषणात व्यासपीठावर शिवसेना-भाजपचे नेते एकत्रित उपस्थित असल्याचा उल्लेख करत हे चित्र दोघांच्याही समर्थकांना सुखावणारे असल्याचा उल्लेख केला. एढ्यावरच ते थांबले नाहीत, तर कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रसंगी शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम करायला आपण व भाजपचे पदाधिकारी तयार असल्याचेही सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख