महापालिका निवडणुकांत नाना पटोलेंना महाआघाडी नको? - nana patole not interested in grand alliance for coming local bodies election | Politics Marathi News - Sarkarnama

महापालिका निवडणुकांत नाना पटोलेंना महाआघाडी नको?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

पक्ष संघटना बळकट करण्यासाठी स्थानिक पातळीवरून काम करा आणि स्वबळावर लढण्यास तयार राहा, असा संदेश पटोले यांनी आज कार्यकर्त्यांना दिला. 

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी आगामी महापालिका निवडणुकांत कॉंग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पदाधिकाऱ्यांना दिले. राज्यातील आगामी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत सर्वांनी एकदिलाने काम करून कॉंग्रेसला विजयी करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर नाना पटोले यांनी नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार व ठाणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिट्यांच्या बैठका घेऊन निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. या वेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आमदार कुणाल पाटील, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप, महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, माणिकराव जगताप, मोहन जोशी, माजी आमदार मधू चव्हाण, डॉ. संजय लाखे पाटील, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले की, सध्या राज्यात कॉंग्रेस पक्षाला अनुकूल वातावरण आहे. कॉंग्रेस पक्षाला मानणारे लोकही मोठ्या संख्येने आहेत. कार्यकर्त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी स्थानिक पातळीवरून काम करा आणि स्वबळावर लढण्यास तयार राहा. महापालिका निवडणुकीत वॉर्डनिहाय जबाबदारी दिली जाईल. त्यानुसार काम करून पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणा. कॉंग्रेसचे सैनिक म्हणून काम करा. पक्षाचे सर्व सेल, विभाग, महिला कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस, सेवादल आणि एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेणे गरजेचे आहे. त्यांना सोबत घ्या. कॉंग्रेस पक्षात सर्व समाजघटकाला न्याय देण्याची भूमिका राहिली आहे. चांगले काम केले तर आगामी विधानसभा निवडणुकीतही कॉंग्रेसची सत्ता येईल, असा विश्‍वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.

पक्ष कार्यकर्त्यांसोबत
आढावा बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी काही अडचणी मांडल्या. काही सूचनाही त्यांनी केल्या. प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन पक्ष त्यांच्यासोबत असल्याचा विश्‍वास दिला

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख