Julio Ribeiro News : फडणवीस,संशयाचे धुके लवकर हटवा ; माजी पोलिस अधिकाऱ्यांचा सल्ला

Deven Bharti News Update : ज्युलिओ रिबेरो यांनी या निर्णयावर टीका करताना एक प्रकारे पोलीस दलाच्या मनोधैर्यावर चिंता व्यक्त केली आहे.
Deven Bharti News Update
Deven Bharti News Update Sarkarnama

Deven Bharti News Update : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले समजले जाणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती (IPS Deven Bharti) यांची नियुक्ती मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती यांची निवड झाल्यामुळे टीकेचे मोहोळ उठले.

या नियुक्तीमुळे पोलिस प्रशानसन व्यवस्थेवर बोट ठेवण्यात आले आहे. अशी आणखी अतिरिक्त पदे निर्माण करायला काहीच हरकत नाही, पण त्यासाठी एक नियमित व्यवस्था असायला हवी, असे मत या क्षेत्रातील जाणकारांचे आहे.

विशेष पोलिस आयुक्तपद मुंबई पोलिस आयुक्तांच्या अधिपत्याखाली राहील, असे सरकारने स्पष्ट केले असले तरी देवेन भारती यांच्याकडे सहपोलिस आयुक्त यांच्या कामावर पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिस दलात हे पद प्रभावी ठरणार असल्याचे सरकारचे मत आहे.

देवेन भारती हे याआधी मुंबईचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था), पोलिस सहआयुक्त, आर्थिक आणि गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र एटीएसचेही नेतृत्व केले आहे. भारती यांच्या या नियुक्तीवरुन विरोधकांनी टीका केली आहे.

प्रशासकीय व्यवस्थेमधूनही देवेन भारती यांच्या नियुक्तीवर ताशेरे ओढले गेले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी या निर्णयावर टीका करताना एक प्रकारे पोलीस दलाच्या मनोधैर्यावर चिंता व्यक्त केली आहे.

मी देवेन भारतींचा अजिबात विरोधक नाही. ते देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील आहेत हेही वास्तव आहे. देवेन भारतींना मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात स्थान मिळण्यामागे हेच मुख्य कारण आहे, असे मला वाटते. सत्ताधारी राजकारणी आपला दबदबा सिद्ध करण्यासाठी असे करत असतात. त्याच वेळी ठरावीक नोकरशहा व पोलीस अधिकाऱ्यांना ते आपल्या विश्वासू वर्तुळात समाविष्ट करून घेतात, असे रिबेरो यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

विशिष्ट पदासाठी विशिष्ट व्यक्तीची निवड करण्याच्या या पद्धतीवर माझा आक्षेप नाही. मात्र, त्यानिमित्ताने होत असलेल्या शासन यंत्रणेचा सूक्ष्म ऱ्हास मला आक्षेपार्ह वाटतो. मुंबईसारख्या महानगरातील रहिवाशांना आपल्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेचा हक्क आहे. त्यासाठी पोलीस दलाच्या नेतृत्वासाठी प्रामाणिक व्यक्ती निवडल्यास व त्याला चांगल्या कामगिरीस पुरेसे स्वातंत्र्य दिल्यास, हे साध्य होऊ शकते.

Deven Bharti News Update
Amrit Sagar Milk election result : महाविकास आघाडीचा धुव्वा ; पिचड पिता-पुत्रांनी सत्ता राखली

ज्युलिओ रिबेरो म्हणतात...

मुंबई पोलिसांत दोन सत्ताकेंद्रे निर्माण झाल्यास सुशासन साधता येणार नाही. एखाद्या विषयावर जर दोन अतिवरिष्ठ अधिकारी असहमत असतील तर समस्या नक्कीच निर्माण होतील. असे सातत्याने होऊ लागले तर ते कामकाजावर दुष्परिणाम करणारे ठरेल आणि पोलीस खात्यात वरपासून खालपर्यंत सगळय़ांचेच मनोधैर्य कायमचे खचेल. गृह खाते सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील असलेल्या व त्यांचा अतीव विश्वास लाभलेल्या व्यक्तीच्या या समांतर अधिकारीपदावरील नियुक्तीमुळे मुंबईकरांच्या मनात भयसूचक भावना निर्माण झाली आहे.

पोलीस महासंचालकपदापर्यंत पदोन्नत करा..

माझे मित्र व माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी एका प्रादेशिक वृत्तपत्रात लिहिले, की मुंबईच्या पोलीस दलात एक नव्हे तर तीन किंवा चार विशेष आयुक्त असण्याची गरज आहे. सरकारला अनेक अतिरिक्त महासंचालकांच्या सेवा घ्यायच्या असतील तर (सध्या अशी ३२ पदे आहेत) त्यांना कायदा व सुव्यवस्था (मुंबईतील ९० विभिन्न पोलीस ठाण्यांच्या नियंत्रणाची जबाबदारी असलेले पद), गुन्हे शाखा, विशेष शाखेच्या सह पोलीस आयुक्तपदांची श्रेणी सध्याच्या पोलीस महानिरीक्षकपदावरून अतिरिक्त पोलीस महासंचालकपदापर्यंत पदोन्नत करावी लागेल.

Deven Bharti News Update
Mahavitaran News : शिंदे-फडणवीस सरकार देणार जनतेला 'या' दरवाढीचा 'शॉक'?

एरवी तसे झाले नसते..

सध्याच्या ३२ अतिरिक्त पोलीस महासंचालकांपैकी काहींची आपल्याकडे कोणतेही काम-जबाबदारी नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे अशांना काहीतरी उपयोगी आणि रचनात्मक काम करण्यास वाव मिळेल. पोलीस महासंचालक दर्जाची एवढी पदे निर्माण करण्याची गरज नव्हती, परंतु थेट राज्य पोलीस सेवेत भरती झालेल्या अधिकाऱ्यांना या पदापर्यंत पोहोचण्यास एरवी वाव मिळाला नसता. त्यामुळे सामान्यत: यापैकी अनेक पदांना काहीही काम नसतानाही ही पदे अशा अधिकाऱ्यांना सामावून घेण्यासाठी प्राधान्याने निर्माण केली गेली. एरवी तसे झाले नसते.

पदे शोधण्याचे अतिरिक्त काम..

सह पोलीस आयुक्तपदाची विशेष पोलीस आयुक्त ही सुधारित श्रेणी निर्माण करताना या शिस्तबद्ध गणवेशधारी सुरक्षासेवेत निकोप वातावरण ठेवण्यासाठी सेवेतील पद-श्रेणींची रचना सांभाळणे गरजेचे आहे. त्याच वेळी अतिरिक्त पोलीस महासंचालकपदांसदर्भातील नाराजी दूर करणे गरजेचे आहे. अर्थात आयुक्तालयातील जबाबदाऱ्या या महानिरीक्षक पदाच्या श्रेणीतील अधिकाऱ्यांकडे आधीच गेल्या आहेत.

रश्मी शुक्ला यांच्यावर विशेष मर्जी

राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या खांद्यावर आता विविध स्तरांवरील प्रत्येक अधिकाऱ्याला पुरेसे काम आणि योग्य पदोन्नतीसाठी पदे शोधण्याचे अतिरिक्त काम आले आहे.बहुतांश विद्यमान आणि निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना असे वाटते, की फडणवीस हे देवेन भारती आणि नव्या जबाबदारीच्या प्रतीक्षेतील रश्मी शुक्ला यांच्यावर विशेष मर्जी राखून आहेत. हे दोन्ही अधिकारी आपापल्या परीने पुरेसे सक्षम आहेत. मात्र, त्यांना देण्यात येत असलेले विशेष प्राधान्यामुळे वातावरण गढुळले आहे.

या खुलाशावर विश्वास ठेवता आला असता...

प्रवीण दीक्षित यांनी मांडलेल्या या सूत्रामुळे या संदर्भातील टीका थंडावली असावी. मात्र, प्रचलित संकेतानुसार राज्याच्या पोलीस महासंचालकांनी हा प्रस्ताव द्यायला हवा होता. पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्त यांच्यातील दुवा असणाऱ्या पदश्रेणीची गरज जनतेसह पोलीस दलाला समजावून सांगून त्यांची मान्यता घेणे आवश्यक होते. विशेष आयुक्त हे आयुक्तांना बांधील असतील असे फडणवीसांनी स्पष्ट केले, परंतु देवेन भारती यांच्याखेरीज अन्य विशेष आयुक्त असते तर या खुलाशावर विश्वास ठेवता आला असता.

फडणवीसांना मार्ग दाखवावा

पोलीस अधिकारी तसेच पोलीस दलाशी संबंधित असलेल्या राजकीय अडचणींवर मात करण्यासाठी फडणवीस यांना आयुक्तालयात विश्वासू माणसाची गरज असल्याचे पोलीस दलात बोलले जाते. अन् यासाठीच देवेन भारती यांची निवड फडणवीस यांनी केली आहे. मात्र, संशयाचे हे धुके फडणवीस जेवढय़ा लवकर हटवतील तितके हितावह आहे. जुन्याजाणत्या प्रवीण दीक्षितांनी आपल्या मार्गदर्शक सूत्रांद्वारे फडणवीसांना मार्ग दाखवावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com