
Mumbai : काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग ऐवजी दिव्यांग हा शब्द प्रयोग करुन अपंग बांधवांना समाजात नवी ओळख मिळवून दिली. आता त्याच धर्तीवर विधवांना गंगा भागीरथी (गं.भा.) म्हणावे, असा प्रस्ताव तयार करण्याचा आदेश राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा(Mangal prabhat Lodha) यांनी महिला व बालकल्याण मंत्रालयातील प्रधान सचिवांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे विधवा महिलांना गंगा भागिरथी (गं.भा) हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन चर्चा करावी असं लोढा यांनी म्हटलं आहे. परंतू, आता यावर सामाजिक कार्यकर्त्यांकडून आक्षेप नोंदवला जात आहे.
पत्रात काय म्हणाले लोढा?
समाजातील उपेक्षित घटकांसह मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय व त्यांची प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अपंग ऐवजी दिव्यांग ही संकल्पना जाहीर केलेली आहे. यामुळे दिव्यांग बांधवांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यात येऊन त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन यातही आमूलाग्र बदल झालेले आहेत.
याच धर्तीवर महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्याकरिता विधवा ऐवजी गंगा भागीरथी हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन चर्चा करावी अशा सूचना पर्यटन , कौशल्य, रोजगार महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिला व बालकल्याण मंत्रालयातील प्रधान सचिवांना पत्राद्वारे केल्या आहेत.
यावर सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी म्हणाले, विधवा महिलांना गंगा भागीरथी म्हणणं एकाचवेळी हास्यास्पद व चुकीचा दृष्टीकोन असणारं आहे. अपंगांना दिव्यांग म्हणा, दलितांना हरिजन म्हणा हे शब्द बदलून वास्तव बदलते का? शब्द टोचण्यापेक्षा तुम्हाला वास्तव टोचले पाहिजे. ते बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं कुलकर्णा म्हणाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ रोजी अपंग ऐवजी दिव्यांग ही संकल्पना जाहीर केली. त्यामुळे दिव्यांग बांधवांना समाजात मानाचं स्थान मिळालं, त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. आता याच धर्तीवर विधवांना सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याच धर्तीवर आता मंगलप्रभात लोढा यांनी महिला व बालविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांकडे विधवा महिलांच्या सन्मानासाठी गंगा भागीरथी शब्द प्रयोग वापरण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.