शिवसेनेची नवी इनिंग ; मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आता क्रिकेटच्या पिचवर..

ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून तर नार्वेकरांकडे नव्या जबादाऱ्या चालून येत आहेत.
Mumbai Premier League
Mumbai Premier Leaguesarkarnama

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या टीममधील आघाडीचे खेळाडू असलेल्या मिलिंद नार्वेकरांची (Milind Narvekar)आता क्रिकेटच्या पिचवरही 'एन्ट्री' झाली आहे. मुंबई क्रिक्रेट असोसिएशनच्या मुंबई प्रिमिअर लीगच्या (Mumbai Premier League) गर्व्हनिंग कौन्सिलचे सदस्यपद नार्वेकरांकडे आले आहे.

यानिमित्ताने लीगच्या सामन्यांच्या व्यवस्थापनातही नार्वेकरांना शिवसेनेतील राजकारणासारखी 'बॅटिंग' करण्याची संधी मिळाली आहे. दुसरीकडे, ठाकरे सरकारमधील नार्वेकरांची ताकद, पडद्यामागची निर्णयाकी भूमिका, ती कृतीत उतरविण्याच्या कलेमुळेच नार्वेकरांना मुंबई प्रिमिअर लीगमध्ये हे स्थान मिळाल्याचे बोलले जात आहे.

मुंबई क्रिक्रेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या शनिवारच्या बैठकीत नार्वेकर आणि नीलेश भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली. पुढील वर्षेभरासाठी नार्वेकर आणि भोसलेंना या पदावर राहून लीग गाजविता येणार आहे.

दरवर्षी यापदावर दोघांची निवड केली जाते, त्यात यंदा शिवसेनेच्या राजकारणातील वजनदार नार्वेकरांचे नाव चर्चेत आले आणि लीगच्या बैठकीत त्यांच्या नावावर पसंतीची मोहर लागली असून, या माध्यमातून नार्वेकर हे नेमके कसे 'क्रिकेट'कारण करणार, याची उत्सुकता राज्याच्या राजकीय वर्तुळात राहणार आहे.

आयपीएलच्या धर्तीवर स्थानिक पातळीवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मुंबई प्रिमिअर लीगचे आयोजन केले जाते. त्यातून होणाऱ्या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी गर्व्हनिंग कौन्सिलच्या सदस्याकडे दिली जाते. त्यामुळे या पदावरील व्यक्तीच्या निवडीला मोठे महत्त्व आहे. यापुढच्या काळातील स्पर्धांसाठी नार्वेकरांना आणून, असोसिएशननेही नव्या इनिंगला सुरवात केल्याचे सांगण्यात येत आहे.

Mumbai Premier League
नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली ; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष

कोरोनाच्या काळात गेली दोन वर्षे मुंबई प्रिमिअर लीग होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता नव्याने जोमाने लीग भरविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून नार्वेकरांकडच्या कौशल्याचा उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने त्यांना संधी दिल्याचे स्पष्ट आहे.

पुढील चार दिवसांत नार्वेकर नवी जबाबदारी स्वीकारून कामाला लागणार आहेत. राज्याच्या सत्ताकेंद्रात आपल्या 'स्मार्ट' राजकारणातून नेहमीच आघाडीवर असलेले नार्वेकर हे अनेक संस्था, संघटनात सक्रिय होत आहेत.

ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून तर नार्वेकरांकडे नव्या जबादाऱ्या चालून येत आहेत. मात्र, क्रिकेट विश्वापासून ते थोडे लांबच होते. परंतु, लीगमधील प्रवेशाने नार्वेकर हे क्रिकेटच्या मैदानातही आपली हुकूमत गाजविण्याची शक्यता आहेत.

नार्वेकरांना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) पीए (स्वीय सहाय्यक) म्हणून ओळखलं जातं. कोकणातील दापोलीत, समुद्रकिनारी असलेला मिलिंद नार्वेकरांचा बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन करून, अवैधरित्या हा बंगला बांधल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर चर्चेत आहेत. काही दिवसापूर्वी प्रसिद्ध देवस्थान तिरुमला तिरूपती ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकर यांची वर्णी लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com