शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकेत : तो आधार संपविण्यासाठी भाजपने पुढे केला मराठी चेहरा

भातखळकर यांना संपूर्ण मुंबईतील पक्षाचा, अगदी बूथ पातळीपर्यंतचा संघटनात्मक ढाचा माहिती आहे. कोणाची ताकद कोठे व किती आहे हे त्यांना ठाऊक आहे.
atul bhatkhalkar.jpg
atul bhatkhalkar.jpg

मुंबई : राजाचा जीव पोपटात तसा शिवसेनेचा जीव हा मुंबई महापालिकेत आहे, तो घेण्यासाठी सज्ज व्हावे, असा आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर या पोपटाचा पराभव करण्याची जबाबदारी भाजपने अतुल भातखळकर यांच्यावर टाकली आहे. भाजपने अतुल भातखळकरांवर विश्वास टाकला याचे पक्षवर्तुळात कोणालाही अजिबात आश्चर्य वाटले नाही. राजकीय जाण, मुंबईची संघटनात्मक बारीक माहिती, आतापर्यंतचे नियोजनबद्ध काम तसेच पक्षनेतृत्वाचा विश्वास असे अनेक मुद्दे भातखळकरांसाठी `प्लस पॉईंट` ठरले आहेत. 

मुंबईचे पक्षप्रमुख जरी मंगलप्रभात लोढा असले तरी प्रभारी म्हणून संपूर्ण पक्षसंघटनेचा समन्वय साधून पक्षाला विजयाकडे नेणे ही जबाबदारी प्रभारी म्हणून भातखळकर यांना पार पाडावी लागणार आहे. महिला मोर्चा, युवा मोर्चा, विविध सेल, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, आमदार, खासदार, कार्यकर्ते आदींशी समन्वय साधून प्रचारमोहीम आखणे, सरकारवर हल्ला चढवणे आणि पक्षाचे चांगले मुद्दे लोकांसमोर मांडणे आदींची आखणी त्यांना करावी लागणार आहे. 

शिवसेना भाजपचे पहिले सरकार 1995 मध्ये सत्तेवर आले तेव्हापासून स्व. प्रमोद महाजन यांच्या सावलीत राहून नियोजन करणाऱ्या भातखळकर यांनी आतापर्यंत पक्षासाठी प्रामुख्याने पडद्यामागे राहून बरेच काम केले आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर किंवा समाजमाध्यमांवर मुद्देसूदपणे आणि आक्रमकपणे बाजू मांडणारा पक्षाचा चेहरा म्हणून ते सर्वांना परिचित आहेतच. पण मागील महापालिका निवडणुकीत त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेली जबाबदारी तसेच अगदी पंतप्रधानांच्या मुंबईतील सभांचे काटेकोर नियोजन अशी त्यांची अनेक कामे पक्षात सर्वांच्याच ध्यानात आहेत. 

भातखळकर यांना संपूर्ण मुंबईतील पक्षाचा, अगदी बूथ पातळीपर्यंतचा संघटनात्मक ढाचा माहिती आहे. कोणाची ताकद कोठे व किती आहे हे त्यांना ठाऊक आहे. सुसूत्रतेने पक्षाचा कारभार कसा चालतो, हे अचूकतेने पाहण्याकडे त्यांचे लक्ष असते. अजिबात वादग्रस्त नसलेले नियोजनबद्ध कामे करणारे इंटॅलेक्चुअल कार्यकर्ते म्हणून ते प्रसिद्ध असून त्यांच्या अभ्यासूपणामुळे सत्ताधारी पक्षही सध्या त्यांना वचकून आहे. 

भातखळकरांसारखी सर्वव्यापी जाण आणि कामाचा आवाका असलेले आणखी फक्त एका हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच नेते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्यात पक्षश्रेष्ठींचा विश्वास असलेले व हाती अन्य काही फार मोठी जबाबदारी नसलेले म्हणून भातखळकरांना प्राधान्य देण्याचा निर्णय झाला. शिवसेना व काँग्रेस यांच्या युतीमुळे आणखीनच अवघड झालेले महापालिका निवडणुकीचे शिवधनुष्य पेलण्यासाठी सर्व नव्या-जुन्या नेत्यांना एकत्र घेऊन चालण्यात तसेच कार्यकर्त्यांना समजून घेण्यात भातखळकर यशस्वी ठरतील, या खात्रीनेच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

भातखळकरांनी मुंबईचे संघनट महामंत्री म्हणून दोन टर्म म्हणजे सहा वर्षे काम केले आहे. त्यांना मुंबईची 227 प्रभागनिहाय व्यवस्थित माहिती आहे, किंबहुना मागील महापालिका निवडणुकीतील तिकिट वाटपादरम्यानही त्यांचा विचार घेण्यात आला होता. त्यांची राजकीय जाणही व्यवस्थित आहे. मुंबई अध्यक्ष लोढा हे हिंदीभाषक असल्याने प्रभारी म्हणून मराठीभाषक व्यक्तीची नियुक्तीच क्रमप्राप्त होती. सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्राची आणि मंगलप्रभात लोढा यांच्यावर मुंबईची एकहाती जबाबदारी सोपविण्यात आली असून भातखळकर हे त्यांच्या विश्वासातील असल्याने त्यांची निवड झाली. 

आघाडी सरकारच्या कामातील दोष हेरून प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांच्या साह्याने सरकारवर तोफ डागण्याचे काम मुंबईत भातखळकर, आशिष शेलार, अमित साटम, किरीट सोमैय्या, राम कदम, गोपाळ शेट्टी हे नेते करीत आहेत. यापैकी शेलार यांच्यावर हैदराबाद महापालिका निवडणुकांची जबाबदारी सोपविल्याचे सांगितले जात आहे. तर सोमैय्या हे आधीच बाजूला पडले आहेत. गोपाळ शेट्टी व मनोज कोटक हे खासदार असल्याने त्यांचे कार्यक्षेत्रच वेगळे पडते. लोढा यांच्या कार्यपद्धतीशी जुळवून घेणे सोपे नसल्याचे दाखवून देण्यात येते. मात्र भातखळकर हे मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असल्याने लोढा यांनीही त्यांनाच पसंती दिली आहे. या निवडणुकीत भाजपचा महापौर स्वबळावर झाला किंवा शिवसेनेचा महापौर स्वबळावर झाला तरीदेखील ही निवडणुक महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी देणारी ठरणार आहे. हे शिवधनुष्य भातखळकर कसे पेलतात हे पाहणे आता औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com