धक्कादायक : अंबानींच्या बंगल्यासमोर सापडलेल्या गाडीच्या मालकाची आत्महत्या

मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर स्फोटके ठेवलेली गाडी आढळली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
Mansukh Hiren whose car was found outside Mukesh Ambanis residence died by suicide
Mansukh Hiren whose car was found outside Mukesh Ambanis residence died by suicide

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती व रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया बंगल्याजवळ 25 फेब्रुवारीला संशयित गाडी आढळून आली होती. त्या गाडीत जिलेटीनच्या 25 कांड्याही सापडल्या होत्या. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. 

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवलेली गाडी आढळली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या गाडीच्या मालकाचा पोलिसांनी शोध घेतला होता. त्यावेळी ती गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात असल्याचे समोर आले होती. ती गाडी काही दिवसांपूर्वी चोरीला गेल्याचेही समोर आले होते. हिरेन हे कालपासून (ता.4) बेपत्ता होते. त्यांच्या नातेवाईकांनी ते बेतत्ता झाल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात आज केली होती. ठाणे पोलिसांना आज हिरेन यांचा मृतदेह रेतीबंदर येथे खाडीत सापडला. त्यांनी खाडीत उडी मारुन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने हिरेन यांचा मृतदेह खाडीतून बाहेर काढला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हिरेन यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. यामुळे या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. 

जिलेटीन प्रामुख्याने भूसुरुंग स्फोट घडवण्यासाठी वापरण्यात येतात. या गाडीमध्ये एक पत्रही मिळाले होते. त्यात धमकीही देण्यात आली होती. या गाडीवर खोटा नंबर टाकण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी या कारच्या खऱ्या मालकाचा शोध लावला होता. ही कार चोरून आणल्याचेही पोलीस तपासात उघड झाले होते. विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही कार चोरून आणल्याचे उघडकीस आले आहे. अंबानी यांना केंद्र सरकारने झेड प्लस ही सुरक्षा दिली आहे. तसेच त्यांची वैयक्तिक सुरक्षाव्यवस्थादेखील काटेकोर आहे.  

मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेरील स्फोटके ठेवलेल्या गाडीची जबाबदारी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाबाहेरची स्फोटकांनी भरलेली गाडी फक्त एक ट्रेलर आहे. मोठे चित्र अजून समोर यायचे आहे, असे जैश-उल-हिंदने म्हटले होते. 'अंबानी यांच्या घराजवळ गाडी सोडणारा सुरक्षित ठिकाणी पोहोचला आहे, असेही नमूद करण्यात आले होते. 

जैश-उल-हिंद या संघटनेनेच दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी घेतली होती. तेव्हापासूनच ही संघटना समोर आली आहे. जैश-उल-हिंद संघचनेचा हात असल्याचा पुरावा जोपर्यंत मिळाला नाही तोपर्यंत या तपासाबाबत कोणतेही निवेदन देणार नाही, तपास यंत्रणांना असा संशय आहे की, व्हायरल स्क्रीनशॉट हा तपास भ्रमित करण्याचा प्रयत्न असू शकतो, असे तपास यंत्रणांच्या सूत्रांनी सांगितले.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com