केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे शुल्क आणखी कमी करावे : मुख्यमंत्री ठाकरेंची मागणी

Petrol - Diesel : राज्य सरकारकडून कोणताही दिलासा मिळणार नसल्याचे संकेत
CM Uddhav Thackeray news
CM Uddhav Thackeray newsSarkarnama

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू आहे. इंधन दरवाढ आणि महागाईवरून विरोधकांनी ओरड सुरू केली होती. अशातच आज मोदी (Narendra Modi) सरकारने महागाईवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपये कपात करण्यात आली आहे. (Petrol Diesel price hike News)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करुन ही घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रतिलिटर 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपयांनी कमी करीत आहोत. यामुळे पेट्रोल 9.5 रुपये तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे, याशिवाय एलपीजी गॅस सिलेंडरवरही 200 रुपये अनुदान देण्याची घोषणाही अर्थमंत्री सीतारमण यांनी केली आहे. (Petrol Diesel price hike News)

दरम्यान, केंद्र सरकारने 7 महिन्यांत कर कपातीचा दुसऱ्यांदा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रासह काही बिगर भाजपशासित राज्यांवर कर कपातीचा दबाव वाढला आहे. केंद्र सरकारने गतवेळी कर कपात केल्यानंतर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ सारख्या राज्यांनी आपले कर कमी केले नव्हते. त्यामुळे ही राज्य काय निर्णय घेतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे. मात्र सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारकडून तरी पेट्रोल-डिझेलच्या दरावर कोणत्याही प्रकारची कर कपात केली जाणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

या उलट मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकरानेच आणखी कर कपात करावी अशी मागणी केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलचा अबकारी कर प्रतिलिटर 18 रुपये 42 रुपये इतका वाढविला होता आणि आज तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी करदेखील १८ रुपये ४२ पैशांनी वाढविले आणि आता 6 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे.

आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना न अडकवता 6-7 वर्षांपूर्वीच्या अबकारी कराइतकी कपात केल्यास देशातील नागरिकांना दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

दरम्यान देशात महागाईचा भडका उडाल्याने मागील वर्षी वर्षी 4 नोव्हेंबरला मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली होती. यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) असल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला होता.

पण या निवडणुका संपताच सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली होती. त्यावेळी पेट्रोल-डिझेलच्या दरात 16 दिवसांत 14 वेळा वाढ करण्यात आली होती. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 10 रुपयांनी महागले होते. त्यानंतर 6 एप्रिलनंतर ही दरवाढ थांबली आहे. त्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.41 रुपये असून, डिझेलचा दर 96.67 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com