Assembly Session Live : घराशेजारी डान्सबार? मुख्यमंत्री शिंदेंनी दिले हे उत्तर!

Maharashtra Monsoon Assembly Session 2022 Live/ Eknath Shinde /Devendra Fadnavis
Devendra Fadnavis-Eknath Shinde  Latest News
Devendra Fadnavis-Eknath Shinde Latest NewsSarkarnama

घराशेजारी डान्सबार? मुख्यमंत्री शिंदेंनी दिले उत्तर!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराशेजारीच डान्सबार सुरू असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. त्याला शिंदे यांनी आज उत्तर दिले. दादांनी सांगितल्यानुसार डान्स बार संदर्भात जी बातमी होती ती जुनी म्हणजे 2021 मधील होती. आता ठाण्यातील डान्स बार सुरू नाहीत. ते जेव्हा सुरू होते तेव्हा मी दादांना त्याबद्दल सांगितले होते. त्याची दखल त्यांनी घेतली असती तर.. असे म्हणत त्यांनी जुनी आठवण अजितदादांना करून दिली.

ठाण्यातील बारच्या विषयी जितेंद्र आव्हाड यांना माहिती आहे, अशी कोपरखळी शिंदे यांनी या वेळी मारली. त्या वेळी आव्हाड यांनी मी डान्स बारमध्ये जात नाही, असे सांगिल्यावर मी असे म्हणालो नाही. डान्स बार बंद असल्याचे आव्हाड यांना माहीत असल्याचे मला सांगायचे, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी केले. मी तुमच्याबद्दल चांगलेच बोललो आहे, असे शिंदे यांनी हसतहसत सांगितले. त्यावर मी तुमच्याबद्दल आणि तुम्ही माझ्याबदद्ल वाईट बोलायचे नाही, असे ठरल्याचे आव्हाड यांनी हसत सांगितल्यानंतर सभागृहात हशा पिकला.

मराठा उमेदवारांना दिलासा, नियुक्त्यांसाठी कायदा करणार

मराठा आरक्षणानुसार नियुक्ती झालेल्या पण नंतर आरक्षण रद्द झाल्यामुळे नोकरी धोक्यात आलेल्या एसीबीसी बाधित उमेदवारांच्या नोकऱ्या कायम ठेवण्यासाठीचे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. त्यानुसार अधिसंख्य पदांना मंजुरी मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर १०६४ अधिसंख्य पदांना मंजुरी देण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आले. या उमेददवारांची मराठा आरक्षणानुसार उमेदवारांची निवड झाली होती. मात्र कोविड कारणास्तव या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यांत आलेल नव्हते. त्यानंतर मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर या १०६४ नियुक्त्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या अधिसंख्य पदांना मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी दिल्यानंतर आज हे विधेयक सभागृहात ठेवण्यात आले.

२०१४ व २०१९ च्या नोकरभरतीत रखडलेल्या मराठा विद्यार्थ्यांना अखेर नियुक्त्या ! छत्रपती संभाजीराजेंच्या आझाद मैदान उपोक्षणाला यश : - डॉ. धनंजय जाधव प्रवक्ते

मराठा समाजाच्या शासकीय नोकरीत निवड झालेले परंतु नियुक्ती न भेटलेल्या उमेदवारांना छत्रपती संभाजीराजेंच्या पाठपुराव्यामुळे शासकीय नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार!

विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळण्यासाठी सुरुवातीपासून मराठा समाजातील विविध संघटना व समन्वयकांनी महत्वपुर्ण भूमिका पार पाडली. छत्रपती संभाजीराजेंच्या आमरण उपोषणाच्या वेळी आग्रहीपणे नियुक्त्यांचा प्रश्न मांडण्याची मला संधी मिळाली, त्याचा मला आनंद आहे.

मराठा समाजाच्या भावना समजून घेवून नियुक्त्यांची मागणी करणारे छत्रपती संभाजीराजे, विविध संघटना राजकीय इच्छाशक्ती दाखवणारे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच तत्कालीन सरकारमधील उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार व नामदार शिंदेसाहेब यांनी त्यावेळी घेतलेली भुमिका यामुळे या विद्यार्थ्यांना न्याय देता आला. प्रशासकीय व विधी अधिकारी यांचे देखील मी आभार मानतो.

बहुप्रतिक्षेनंतर नियुक्त होणाऱ्या सर्वच नव अधिकारी व शासकीय नौकरदारांचे हार्दीक अभिनंदन व पुढील वाटचालीस "स्वराज्य" संघटनेच्या हार्दिक शुभेच्छा !

औरंगाबादसह उस्मानाबादचे नामांतर करण्याचा ठराव मंजूर

राज्य सरकारने औरंगाबादहस उस्मानाबाद शहराचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. या नामांतराचा अंतिम अधिकार हा केंद्रीय गृहखात्याला असल्याने त्यासाठीची शिफारस आज विधानसभा ठरावाद्वारे करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठराव मांडला. औरंगाबाद शहर, जिल्हा, तालुका यांचेही नामांतरण करण्यात येणार आहे.

उस्मानाबाद शहर, जिल्हा आणि तालुका यांचेही नामांतरण धाराशीव करण्याचा ठराव आज पाठविण्यात आला. याशिवाय नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करावे, अशी शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाला करण्यात आली.

या वेळी आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय झाला आहे. त्याचाही पाठपुरावा सरकारने करावा, अशी मागणी या वेळी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी याचा पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in