'तो' एफआयआर संजय पांडेंना अडचणीत आणणार? भाजपची राज्यपालांकडे तक्रार

आपल्या नावाने बनावट एफआयआर केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
'तो' एफआयआर संजय पांडेंना अडचणीत आणणार? भाजपची राज्यपालांकडे तक्रार
Bjp Leaders meet GovernorBhagat Singh KoshyariSarkarnama

मुंबई : आपल्या नावाने बनावट एफआयआर केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्या आदेशावरून हे एफआयआर केल्याचा दावाही सोमय्यांनी केला आहे. त्यावरून पांडे यांच्याविरूध्द सोमय्या यांच्यासह इतर नेत्यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता राज्यपाल त्यावर गृह सचिवांकडून अहवाल मागवण्याची शक्यता आहे.

सोमय्या यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि अर्धा डझन वकिलांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सोमय्या म्हणाले, संजय पांडे यांनी बनावट एफआयआरवर कशाप्रकारे कारवाई करायला लावली, याची तक्रार राज्यपालांना केली आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याच आश्वासन दिले आहे.

Bjp Leaders meet GovernorBhagat Singh Koshyari
नवनीत राणांच्या आरोपांविषयी आणखी एक सत्य समोर; न्यायालयात सांगितलं होतं...

मुख्यमंत्र्यांनी पांडे यांना ताबडतोब निलंबित करायला हवे. खार पोलिसांनी एफआयआरवर कुणाचीही सही नसल्याचे मान्य केले आहे. हे एफआयआर अस्तित्वातच नाही. सरकार आणि आयुक्त कसे बनवाबनवी करत आहेत, हे यावरून दिसते. शिवसेनेच्या 70-80 कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी हे केले गेले. खरी एफआयआरही घेतली जात नाही. उध्दव ठाकरे यांची आयुक्त चमचेगिरी करत आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला.

कमांडोंनी माझी गाडी बाहेर काढली. दगडामुळे काच फुटली. ती काच तोंडाला लागली. जखम छोटी होती. त्यामुळे थोडं रक्त आलं. माझ्या जीवाला धोका आहे, असं मी सांगितलं होतं. पण त्यानंतरही पोलिसांनी जायला सांगितलं. मी थोडक्यात वाचलो. पण आता आम्ही ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांना मारण्याचे काम करू, असंही सोमय्या म्हणाले. दरेकर यांनी पोलिसांमार्फत दहशतवाद पसरवला जात असल्याचे सांगितले.

सोमय्यांवर हल्ला, बनवाट एफआयआरबाबतचा घटनाक्रम राज्यापलांच्या कानावर घातला आहे. किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला झाला आणि त्यांच्याच चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. सोमय्या हे अचानक गेले नव्हते. तिथल्या पोलिसांची जमाव पांगवण्याची आवश्यकता होती. मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून हे सर्व सुरू होतं. सर्व अधिकाऱ्यांवर दबाव होता. सोमय्या यांना झेड सुरक्षा असूनही हल्ला होत आहे, मग सर्वसामान्य माणसांनी कसं जगायचं. झेड सुरक्षा नसती तर हत्या झाली असती. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. त्यामुळे शेवटची आशा म्हणून आम्ही राज्यपालांकडे गेलो होतो. राज्यपालांनी या प्रकरणाची चौकशी करून गृह सचिवांकडून अहवाल मागवावा, अशी मागणी केल्याचे दरेकरांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.