kangana ranaut demands 2 crore from bmc for demolition of bunglow | Sarkarnama

माझा बंगला पाडला, आता दोन कोटी द्या! कंगनाची उच्च न्यायालयात धाव

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम मुंबई पालिकेने पाडले होते. या विरोधात कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

मुंबई : वांद्र्यातील पाली हिल येथील अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बंगल्यातील बेकायदा बांधकाम मुंबई महापालिकेने पाडले होते. या विरोधात कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईस स्थगिती दिली होती. कंगनाच्या वतीने तिच्या वकिलांना आज याचिकेत काही सुधारणा केल्या असून, दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मुंबई महापालिकेकडे मागितली आहे. कंगनाने या याचिकेत शिवसेनेचे नाव मात्र, घेतलेले नाही. 

महाराष्ट्र सरकारच्या विरोधात बोलल्याने माझ्या बंगल्यावर कारवाई करण्यात आली, असे कंगनाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. तिने म्हटले आहे की, माझ्या मतांमुळे काही घटक नाराज झाले आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी असलेल्या राजकीय पक्षाचे लोकही संतप्त झाले. याच पक्षाची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. 

मुंबई महापालिकेच्या पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती. कंगनाच्या कर्मचाऱ्यांनी नोटीस न स्वीकारल्याने बंगल्याच्या दर्शनी भागी ती लावण्यात आली होती. बंगल्यात झालेल्या कामाच्या परवानगीची कागदपत्रे 24 तासांत सादर करण्याची मुदत तिला देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर महापालिकेचे पथक बुलडोझर घेऊन कंगनाच्या बंगल्यावर गेले. पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत भाग हातोडा आणि बुलडोझरच्या सहाय्याने पाडून टाकला होता. 

हा बंगला निवासी असल्याने त्यात कार्यालय सुरू करण्यासाठी रीतसर परवानगी घेणे गरजेचे होते. पालिका अधिनियम 354 (अ) अंतर्गत कोणत्याही निवासी जागेचा व्यावसायिक वापर करता येत नाही, असेही या नोटिशीत म्हटले होते. या बंगल्यामध्ये चटई क्षेत्र नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी वाढीव बांधकामही करण्यात आले आले; तर पूर्वीची दोन बांधकामे जोडण्यात आली आहेत. तसेच अंतर्गत बदलही करण्यात आले आहेत. यात स्वच्छतागृह तोडून त्या जागी कार्यालय बांधण्यात आले आहे. तसेच परवानगी न घेता नवे स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे, असे प्रथमदर्शनी दिसते, असे नोटिशीत नमूद केले होते. 

कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत काम : 
1) ग्राऊंड फ्लोअरवरील टॉयलेटला ऑफिस केबिन मध्ये रूपांतरीत केले आहे
2) स्टोअर रूमचा किचन रूम मध्ये रूपांतर 
3) ग्राऊंड फ्लोअरवर पायऱ्यांवर अनधिकृत टॉयलेट 
4) तळ मजल्यावर अनधिकृत किचन तयार
5 ) देवघर आणि लिव्हिंग रूम अनधिकृत केबिन आणि लाकडी पार्टिशन 
6 ) पहिल्या मजल्यावर अनधिकृत शौचालय
7 ) समोर बाजूस अनधिकृत स्लॅबची निर्मिती
8 ) दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत जिना निर्मिती
9 ) दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बाल्कनी निर्मिती

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख