कोश्यारींना परत बोलवा नाही तर राजभवनात घुसू : आव्हाड संतापले

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका
Bhagat Singh Koshyari, Jitendra Awhad
Bhagat Singh Koshyari, Jitendra Awhadsarkkarnama

ठाणे : मराठी माणसाने जेव्हा मुंबई हातात घेतली, तेव्हा १०५ लोक न घाबरता बंदुकीच्या गोळ्यांना सामोरे गेले होते. आम्ही मुंबई घेतली आहे. तेव्हा आता आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना परत बोलवा, असे म्हणणार नाही तर आता त्यांना पळवून लावू, गरज पडली तर राजभवनात घुसू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी दिला.

भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई-ठाण्याबद्दल केलेल्या विधानाचा आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. आव्हाड म्हणाले, एव्हाना आपण या राज्यपालांबाबत कधी बोलतच नव्हतो, त्यांनी महाराष्ट्राचा बराच वेळा अपमान केला, तरी मी फार काही लक्ष दिले नाही. कारण मराठी माणसांना ते काय बोलतात त्याविषयी काही वाटत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी महात्मा फुलेंचा अपमान केला, मला वाटते तेव्हाच त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी होती.

राज्यपालांना नेहमी अहो जाहो म्हंटले जाते. महामहीम राज्यपाल असे संबोधले जाते. मात्र, आता त्यांची तशी लायकी उरलेली नाही. त्याला मराठी माणसांची किंमत समजली नाही. महाराष्ट्राचे थोर कवी, दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे म्हणतात, "ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर, कष्टकऱ्यांच्या तळहातावर उभी आहे", यातच मराठी माणसाची ओळख आहे.

Bhagat Singh Koshyari, Jitendra Awhad
Mumbai : राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा : नाना पटोले

ज्या दोन समाजांबद्दल राज्यपाल बोलले त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आणि प्रेम आहे. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोक त्यांच्या राज्यात मेहनत करून मोठे का नाही झाले, कारण इथल्या कष्टकऱ्यांनी घाम गाळला, त्या घामातने निर्माण झालेली ही संपत्ती. आज त्यांनी या मराठी जनतेचा अपमान केला. ते कोण आहेत, कोणाचे आहेत, कशाचे आहेत काही घेणेदेणे नाही मला. स्पष्ट भूमिका असेल प्रत्येक मराठी माणसाची वाट्टेल ते सहन करू. मात्र, मराठी माणसाच्या अस्मितेला हात घातलेला सहन करणार नाही, असा इशारा आव्हाड यांनी दिला.

रक्ताचे पाट वाहिलेत ही मुंबई घेताना, तेव्हा त्या मुंबई बद्दल अभिमान आणि ऋणानुबंध जुळलेले आहेत आमचे. १८७३ ला इथे पोर्ट सुरू झाले, १८७५ ला मुंबईत पहिल्यांदा स्टॉक एक्स्चेंज सुरु झाले. हा इतिहास आहे. म्हणजे देशाचे जे निव्वळ व्यावसायिक रुप आहे ते ते मुंबईने दिले भारताला. इथले टाटा असो, इथले बिर्ला असो, फिरोदिया असो, बजाज, मित्तल, रहेजा हे का नाही त्यांच्या राज्यात जाऊन मोठे झालेत, आमच्या राज्यात मोठे झाले.

कारण हा या मातीचा गुण आहे, ही माती ज्याने डोक्याला लावली, तो कधी मागे बघत नाही, इथे पडलेल्याला उचलण्याची मराठी माणसाला सवय आहे. तीच मराठी माणसाची जगात ओळख आहे. आम्ही कुत्सित आहोत म्हणून ओळखले जात नाहीत, तर हे हृदय प्रसंगी हिमालयापेक्षा विशाल असते, हिच ओळख सह्याद्रीची आहे. आज तुम्ही या सह्याद्रीचा, मराठी मातीचा अपमान केला. त्यामुळेच कोश्यारी यांनी माफी मागितलीच पाहिजे, असेही आव्हाड म्हणाले.

कोश्यारी आता सारवासारव करताहेत मात्र, ते त्यांचे दरवेळेचे नाटक असते. महात्मा फुलेंबद्दल ते जे काही बोलले ते एवढे घृणास्पद आणि घाणेरडे होते की मी त्याबद्दल बोलणेच टाळले. अक्षरशः मला तर माझ्या भाषेतल्या शिव्या घालु वाटताहेत ज्या मी सार्वजनिक रीत्या देऊ शकत नाही. मात्र, इतका नालायक माणूस महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. जोपर्यंत ते राजकीय बोलत होते, तोपर्यंत मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. कारण आपल्या पदाचा ते वारंवार गैरवापर करत होते, असंवैधानिक वागत होते. पण राजकारणा असा वापर केला जातो, त्याच्यात काही मोठे काही होणार असे नाही. पण आता ते जे काही बोलले आहेत तो मराठी मातीचा, मराठी माणसाचा अपमान त्यांनी केला आहे.

हा फक्त मुंबईचाच अपमान नाही तर मराठी माणसाचा अपमान आहे, ते म्हणताहेत की तुम्ही हे गुजराती, राजस्थान्यांच्या जिवावर मोठे आहात, म्हणजे तुम्ही सगळे आहात ना. ते गेले तर तुम्हाला पगार मिळणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. आता तुम्ही काय करायचे ते ठरवा. हा तुमच्या माझ्या अस्मितेचा प्रश्न आहे. शेवटी आपण सगळी मराठी माणसे आहोत हे विसरू नका. या मराठी आईने आपल्याला मोठे केले, जिवंत ठेवले, या मराठी आईने आपल्याला अनेक वाटा दाखवल्यात, या वाटांचा कोणी मालक नाही, आम्ही त्यांना वाट दाखवली, त्याच्या वरून चाललेत म्हणून कदाचित मोठे झाले असतील पण या वाटांचे मालक आम्ही आहोत. आमचा घाम आहे त्या वाटांमध्ये. मुंबईमध्ये गिरण्या होत्या, गिरण्यांमध्ये कोण होते. २-२ लाख गिरणी कामगार काम करत होते. बजाज पुण्यामध्ये कोणामुळे मोठे झाले, फिरोदिया कोणामुळे मोठे झाले, बिर्ला, टाटा, रहेजा, गोदरेज कोणामुळे मोठे झाले. या मराठी माणसाने रक्ताचे पाणी केले, घाम गाळलाय या घामाचा हा अपमान आहे, असे आव्हाड म्हणाले.

Bhagat Singh Koshyari, Jitendra Awhad
जीभ वारंवार घसरते आहे; योग्य राज्यपाल महाराष्ट्रसाठी द्यावा : संभाजीराजेही मैदानात

पैशाचे काय सांगताय, ब्रिटीशांना मराठी माणसानेच कर्ज दिले होते

गुजराती, राजस्थानी लोक महाराष्ट्रातून गेले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानीही राहणार नाही. या कोश्यारी यांच्या वाक्यावर डॅा. जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखला देत कोश्यारी यांना चांगलीच चपराक लगावली. पैशाचे मराठी माणसाला काय सांगता? नाना शंकरशेठ हा मराठी माणूस इतका गर्भश्रीमंत होता की व्यवसायासाठी ब्रिटीशही त्यांच्याकडून कर्ज घ्यायचे. ज्यांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता त्या ब्रिटीशांना कर्ज देणारा माणूस याच मुंबईतील मराठी होता, हे कोश्यारींनी ध्यानात घ्यावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in