यशवंत जाधव यांच्या भोवतीचा फास आवळला; 'प्राप्तीकर'ची मोठी कारवाई

यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असून शिवसेनेचे बडे नेते आहेत.
Yashwant Jadhav
Yashwant JadhavSarkarnama

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव (Yasahwant Jadhav) यांच्या अडचणीत भर पडत चालली आहे. प्राप्तीकर विभागाने (Income Tax) आता त्यांच्या भोवतीचा फास आवळला असून मोठी कारवाई केली आहे. जाधव यांच्या तब्बल 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. जाधव यांनी काही व्यवहार हवालामार्फत केल्याचा संशय प्राप्तीकर विभागाला असून त्याची चौकशी सुरू असल्याचे विभागाने स्पष्ट केलं आहे. (Yashwant Jadhav News)

प्राप्तीकर विभागाने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस यशवंत जाधव यांच्या घरासह इतर मालमत्तांवर छापेमारी सुरू केली होती. काही दिवस ही कारवाई सुरू होती. त्यानंतर आता जवळपास दीड महिन्याने विभागाने जाधव यांच्याकडील 41 मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे मुंबईतील घर व कोकणातील मालमत्ता जप्त केली आहे. त्यावरून राज्यातील राजकारणही तापलं आहे. त्यातच आता जाधव यांच्याही मालमत्ता जप्त केल्याने मुंबईत शिवसेना (Shiv Sena) व भाजप (BJP) संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

Yashwant Jadhav
मनसेला मोठा धक्का; राज्यातील पहिल्या नगराध्यक्षांना एकनाथ शिंदेंनी ठरवलं अपात्र

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जाधव यांच्या डायरीत मातोश्री अशी नोंद असल्याने राजकारण तापलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घराचे नावही मातोश्री असल्याने भाजप नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी या डायरीत आणखी दोन नावं असल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी पहिलं नाव 'केबलमॅन' असून त्याच्यासमोर एक कोटी 25 लाख रुपये दिल्याची नोंद आहे. तर दुसरं नाव 'M-ताई' हे असून त्यासमोर 50 लाख लिहिले असल्याची माहिती समोर आली आहे. ही दोन नावे म्हणजे नेमकं कोण, यावरून आता चर्चांना उधाण आलं आहे.

यशवंत जाधवांच्या पत्नीचे शपथपत्राने पोलखोल

यशवंत जाधव यांनी बीएमसीच्या ३० कोटी रुपयांच्या विविध कंत्राटांसाठी बिमल अग्रवाल यांची मर्जी राखल्याचा आयकर विभागाला संशय आहे. जाधव यांच्या पत्नी आणि मुंबईतील भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांनी 2019 मध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. यात कोलकाता येथील प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून झालेल्या व्यवहाराची माहिती प्राप्तिकर विभागाला या शपथपत्रातून मिळाली होती. जाधव आणि कुटुंबीयांना भायखळा येथील इमारत खरेदीसाठी सुमारे १५ कोटी रुपये कंपनीने दिले होते. जाधव कुटुंबीयांनी नंतर हे पैसे कंपनीला परत केले, जे नंतर कंपनीने न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित केले.

Yashwant Jadhav
मी शिवसेनेत यावे म्हणून अनेक प्रयत्न केले पण...! कारवाईनंतर खेडेकरांनी दिलं आव्हान

31 फ्लॅट खरेदी केले, हवालाद्वारे पैसे दिले

जाधव यांनी भायखळा येथील बिलकाडी चेंबर्स येथे न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून 31 फ्लॅट खरेदी केल्याची माहिती आहे. जाधव यांनी इमारतीतील चार ते पाच भाडेकरूंना 30 ते 35 लाख रुपये दिले होते. भाडेकरूंना हवालाद्वारे काही देयके देण्यात आली. विभाग इतर चाळीस मालमत्तांचीही चौकशी करत आहे. या मालमत्ता जाधव यांच्याशी संबंधित असल्याचा संशय आहे.

1.75 कोटींना हॉटेल खरेदी केले, 20 कोटींना विकले

जाधव यांच्या सासू सुनंदा मोहिते यांनी भायखळा येथे इंपिरियल क्राउन नावाचे हॉटेल खरेदी केले होते. न्यूजहॉक मल्टीमीडियाने ते हॉटेल भाड्याने दिले होते. यानंतर न्यूजहॉक कंपनीला बीएमसीकडून क्वारंटाइन सेंटरचे कंत्राट मिळाले. हे हॉटेल 1.75 कोटींना विकत घेण्यात आले होते, परंतु नंतर सुमारे वर्षभरात 20 कोटींना विकले गेले. जाधव यांच्या सासूबाईंनी हे हॉटेल खरेदी करण्यात प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com