
मुंबई : भाजपमध्ये (BJP) पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची मुदत पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात संपत आहे. त्यासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्याची चाचपणी सुरू केली आहे. या शर्यतीत सर्वात आघाडीवर मुंबईतील आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) असल्याची चर्चा आहे. पण त्यांच्या नावाला पक्षातूनच विरोध असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांच्या जुलै 2019 मध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली आहे. त्यांच्याआधी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे ही जबाबदारी होती. तर मुंबईच्या अध्यक्षपदी त्यावेळी आशिष शेलार होते. पण त्यांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडल्यानंतर मंगलप्रभात लोढा यांच्यावर मुंबईची जबाबदारी टाकण्यात आली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शेलार यांच्याकडे निवडणूक संचालन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
शेलार हे भाजपमधील आक्रमक नेते मानले जातात. पण ग्रामीण भागातील नेत्यांचा प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाला विरोध असल्याची माहिती सुत्रांनी दिली. फेब्रुवारी 2023 मध्ये चंद्रकांत पाटील यांचा कार्यकाळ संपत असून, आतापासूनच भाजपमध्ये या पदासाठी लॉबिंग सुरू आहे. यामध्ये सर्वात पुढे शेलार असल्याचे समजते. पण त्यांच्या नियुक्तीला अंतर्गत विरोध होत आहे.
केवळ मुंबईपुरता मर्यादित असलेला प्रदेशाध्यक्ष नको, अशी भूमिका ग्रामीण भागातील नेत्यांनी घेतली आहे. काही नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत कानावर घातल्याचे सुत्रांनी सांगितले. आता ओबीसी नेत्याची प्रदेशाध्यक्षाची निवड करावी, अशी मागणीही काही नेत्यांनी केली आहे. त्यामुळे आता पाटील यांच्यानंतर भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.