
Maharashtra Politics: कसब्याची पोटनिवडणूक जिंकल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काँग्रेसने कसबा भाजपकडून ३० वर्षांनंतर जिंकला. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी जॉर्ज फर्नांडीस यांचा एक किस्सा सांगितला. तसेच विरोधक एकत्र आले की कितीही वर्षांचे बालेकिल्ले भूईसपाट होतात, असा विश्वास व्यक्त करीत भाजपला ठाकरे यांनी इशारा दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाने कसबा येथे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना पाठिंबा दिला होता. आदित्य ठाकरे यांनीही महाविकास आघाडीतर्फे धंगेकर यांच्यासाठी प्रचार, रोड शो केला होता. रवींद्र धंगेकर यांच्या विजयाने ठाकरे यांना जॉर्ज फर्नांडिस यांचा एक किस्सा आठवला.
काँग्रेसचे मातब्बर असलेले स.का. पाटील यांना नवख्या जॉर्ज फर्नांडिस (George Fernandes) यांनी पराभूत केले होते. तसेच धंगेकरांनी भाजपचा ३० वर्षांचा बालेकिल्ला भूईसपाट केला. या विजयाची आपण राज्यभर पुनरावृत्ती करू शकतो. आपण सर्वांनी पुढील निवडणुका एकत्र येऊन लढल्या पाहिजे, अशी अपेक्षाही यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली.
देशाची लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम जनतेने केले आहे. ही जनताच खोकेवाल्यांची होळी करणार आहे, अशी टीकाही यावेळी ठाकरे यांनी केली. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राजकारणातील कटुतेवर केलेल्या विधानावरही ठाकरेंनी भाष्य केले.
ते म्हणाले की, "भाजपसोबत गेले नाहीत त्यांच्यावर कारवाई होते. राजन साळवी, वैभव नाईक, अनिल परब आणि नितीन देशमुख यांच्यावर जे चालले आहे, ती सूड भावना नाही का? हा बदला नाही का?" तसेच भाजपकडून सुरू असलेली कारवाई ही दुसरे पक्ष फोडण्यासाठी असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.
ठाकरे म्हणाले, "आमच्याकडील काही लोक तुम्ही घेतले. त्यांच्यावर गोमूत्र शिंपडले का? त्यांची कारवाई बंद झाली. आमच्या लोकांवर आताही चौकशी सुरू आहे. त्यांना पक्षात घेण्यासाठी कारवाई सुरू आहे का? ते पक्षात आल्यावर त्यांना क्लिनचीट देणार आहात का? हा सत्तापिपासूपणा आहे. पक्षात या नाही तर तुरुंगात जा, असे धमकावले जात आहे. विरोधकांना नामोहरम करणे सुरू आहे."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.