
मुंबई : राज्यात मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा तापलेला आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हे भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ४ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. अशातच राज ठाकरेंवर औरंगाबादच्या सभेमध्ये केलेल्या भाषणाप्रकरणी कारवाई होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. औरंगाबाद पोलिसांनी या भाषणाची संपू्र्ण रेकॉर्डिंग ऐकली असून "एकादाच होवून जावू द्या" हे वाक्य ठाकरे यांना भोवणार असल्याचे सांगितले जात आहे. (Raj Thackeray latest news in Marathi)
राज ठाकरेंवरील या कारवाईसंदर्भात गृहमंत्रालयाची आज सकाळपासून खलबत सुरु असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे बैठकांचे सत्र सुरु आहे. आज सकाळी वळसे पाटील यांची पोलिस महासंचालकांसह गृहमंत्रालयाचे अधिकारी आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडत आहे. त्याचवेळी पोलिस औरंगाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्याही घरी पोहचले आहेत. त्यांच्याशी पोलिसांची चर्चा सुरु आहे.
राज ठाकरे यांना या सभेला परवानगी देण्यापूर्वी औरंगाबाद पोलिसांनी एकूण १६ अटी आणि शर्ती घालून दिल्या होत्या. यात समाजिक सलोखा बिघडू नये, दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, कोणाच्याही भावना दुखावू नये, चिथावणीखोर वक्तव्य करु नये अशा अटींचा समावेश होता. मात्र राज ठाकरेंच्या या भाषणादरम्यान बहुतांश अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाले असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर कारवाईची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्र पोलिस हाय अलर्टवर :
राज्यात कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिला आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच १५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून १३ हजार जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
यावेळी राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील भाषणाबाबत विचारले असता रजनीश शेठ म्हणाले, औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाची सखोल पडताळणी केली आहे. त्यासंबंधी आवश्यक ती कारवाई करण्यासाठी ते सक्षम आहेत. जी कारवाई करायची आहे ते ती नक्कीच करतील, असेही त्यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.