`असल्या उद्योगांबद्दल मी परमवीरसिंह यांना थेट निलंबित केले असते..`

देवेंद्र फडणवीस हे सर्वात मोठे खोटारडे असून ते विधिमंडळात सुद्धा खोटे बोलतात, असा आरोप पटोले यांनी केला.
nana patole-parambirsingh
nana patole-parambirsingh

मुंबई : काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्या स्वभावाप्रमाणे आक्रमक झाले असून मी सरकारमध्ये असतो तर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमविरसिंह यांनी केलेल्या वर्तणुकीनंतर त्यांची बदली केली नसती तर थेट निलंबित केले असते, असे विधान त्यांनी केले.  या प्रकरणावर राज्य सरकार आणि गृहमंत्री कठोर भूमिका घेत नसल्याचा अर्थ त्यांच्या वक्तव्यावरून निघतो. 

परमवीरसिंह, त्यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप, पोलिसांच्या बदल्यांमध्ये रॅकेट असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप यावर पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? आणि त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना असून ते त्यांचा अनुभव कथन करत आहेत. पाच वर्षे सत्तेत असताना मंत्रालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सर्व विभागात कसे घुसवले होते, ते किती वसुली करत होते व त्यातला किती वाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जात होता, याची चौकशी करण्याची मागणी आपण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून करणार आहोत, असे उत्तर त्यांनी दिले.

पोलिस बदल्यांवरून देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेल्या आरोपाचा नानांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, फडणवीस यांनी सत्तेत असताना रश्मी शुक्लासारख्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोणाला किती वाटा द्यायचा याचा मोठा अनुभव मिळवलेला आहे. भाजपाने आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारचा दबाव आणून सत्तेचा गैरवापर केला. या अधिकाऱ्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनून काम करू नये. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजपा करत आहे परंतु महाराष्ट्राची जनता त्यांचा हा खेळ ओळखून आहे. फडणवीस हे स्वतःच जज असल्याच्या भूमिकेत वावरत आहेत. सरकारला बदनाम करण्यासाठी कधी अधिकारी तर कधी राजभवनच्या माध्यमातून भाजपाचे हे उद्योग सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस हे सर्वात मोठे खोटारडे असून ते विधिमंडळात सुद्धा खोटे बोलतात.

माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावर कालपर्यंत हेच भाजपावाले टीका करत होते, आता ते त्यांचे प्रिय कसे झाले? ते कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत याची आम्हाला माहिती आहे. खा. मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली त्याचा एफआयआर दाखल करण्यातही परमवीरसिंह यांनी टाळाटाळ केली. त्यांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. मूळ मुद्दा हा मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जीलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या गाडीचा होता. या जेलिटीनच्या कांड्या कुठून आल्या याचा तपास सुरु असताना हिरेन मृत्यू प्रकरण आले. या प्रकरणाचा एटीएस उत्तम रितीने तपास करत असताना भाजपाने एनआयएकडे तपास देण्याची मागणी केली. आता त्याला आणखी फाटे फोडले जात आहेत. वास्तविक पाहता जनता महागाईने होरपळून निघत आहे. शेतकरी आंदोलनावर ११० दिवसांनंतरही मोदी सरकार निर्णय घेत नाही, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. या मूळ समस्यांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा हा सर्व खटाटोप चालला आहे, असेही पटोले म्हणाले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील,  आ. संग्राम थोपटे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com