मी राज्यभर फिरलो... त्याचे प्रतिबिंब ग्रामपंचायत निकालात - I traveled all over the state which reflected in the Gram Panchayat results says Devendra Phadanvis | Politics Marathi News - Sarkarnama

मी राज्यभर फिरलो... त्याचे प्रतिबिंब ग्रामपंचायत निकालात

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 18 जानेवारी 2021

ग्रामपंचायत निवडणुकीतून नागरिकांचा सरकारच्या विरोधातील रोष दिसून आला आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊनही भाजपच नंबर एकचा पक्ष ठरला.

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीतून नागरिकांचा सरकारच्या विरोधातील रोष दिसून आला आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊनही भाजपच नंबर एकचा पक्ष झाला. मी कोरोना परिस्थिती, ओला दुष्काळ या काळात गावोगावी फिरल्याचे प्रतिबिंब निकालांमध्ये पाहायला मिळतेय, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. राज्यात तिन्ही पक्षांना मागे टाकत भाजपच नंबर एकचा पक्ष असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाला मिळालेल्या ग्रामपंचायतींचा आकडे सांगत विरोधाकांना धोबीपछाड दिल्याचे म्हटले होते. त्यांच्या पाठोपाठ फडणवीस यांनीही भाजपच नंबर एकचा पक्ष असल्याचा पुनरूच्चार केला. तसेच विरोधकांवरही त्यांनी जोरदार टीका केली.

फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असलेल्या पॅनलमधील उमेदवारांना चांगले यश मिळाले आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकत निर्विवाद सत्ता मिळविली आहे. इतर पक्षांपेक्षा आम्ही खुप पुढे असून नंबर एकचा पक्ष ठरला आहे. आता महापालिका निवडणुकीतही भाजपच राज्यात नंबर एकचा पक्ष ठरेल, मी कोरोना परिस्थिती, ओला दुष्काळ या काळात गावोगावी फिरल्याचे प्रतिबिंब निकालांमध्ये पाहायला मिळतेय. सरकारविरोधात नागरिकांचा रोष दिसून येत आहे. शेतकरी, मजुर, बारा बलुतेदारांना सरकारने मदत केली नाही. 

शिवसेनेवर टीका करताना फडणवीस म्हणाले, विदर्भात शिवसेनेचे अस्तित्वच दिसत नाही. इथे भाजपाला मोठे यश मिळाले आहे. सत्तेत असताना रत्नागिरीमध्ये यश मिळाले नव्हते. पण या निवडणुकीत रत्नागिरीसह रायगड, ठाण्यातही चांगला प्रतिसाद मिळाला. सिंधुदुर्गात 80 टक्के ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळाली आहे. 

हिंमत असेल तर औरंगाबादचे नामांतर करा

युतीमध्ये असताना शिवसेनेने औरंगाबादचे नामांतर करण्यासाठी राजीनामे का काढले नाहीत, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. हिंमत असेल तर संभाजीनगर म्हणून नामांतर करून दाखवा, असे आव्हानही त्यांनी शिवसेनेला दिले. शिवसेनेच हिंदुत्व आता राहिलेच कुठे आहे? त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये जाऊन निवडणूक लढवावी. पण बिहार मध्ये काय झाले हे सर्वांनाच माहित आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपकडे सहा हजारांहून अधिक ग्रामपंचायती

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असून 14 हजार पैकी 6 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये आघाडी घेतली आहे. ही आघाडी आणखी वाढणार असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. 

शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कोकणातही भाजपला उल्लेखनीय यश मिळाले. त्यामुळे कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचा समज खोटा ठरला आहे. सिंधुदुर्गमध्ये ७० पैकी ५५ च्या जवळपास ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलले आहे. देवगडमध्ये २३ पैकी १७, वैभववाडीत १२ पैकी ९ ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. मालवणमधील सहा पैकी पाच तर कुडाळमधील पाच पैकी चार ग्रामपंचायती जिंकत भाजपने मुसंडी मारली आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख