परमबीरसिंहांच्या जिवाला धोका असल्याचे ऐकून गृहमंत्री वळसे पाटलांना बसला धक्का!

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह हे मुंबईत परतले असून, त्यांनी गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली आहे.
परमबीरसिंहांच्या जिवाला धोका असल्याचे ऐकून गृहमंत्री वळसे पाटलांना बसला धक्का!
Dilip Walse Patil and Param Bir SinghSarkaranama

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) तब्बल सहा महिन्यांनी मुंबई दाखल झाले आहेत. त्यांनी गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली आहे. परमबीरसिंह यांनी जिवाला धोका असल्याचा दावा केला होता. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

परमबीरसिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. ते सहा महिने गायब होते. त्यांनी जिवाला धोका असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात केला होता. यावर बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, मुंबई आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी काम केलेल्या व्यक्तीच्या जिवाला भीती आहे हे ऐकून मला धक्का बसला. एवढ्या मोठ्या पदावर काम केलेल्या व्यक्तीला भीती वाटत आहे. त्यांना कुणापासून धोका वाटत असेल तर त्यांनी आम्हाला सांगावे. आम्ही त्यांच्या तक्रारीवर कार्यवाही करू.

सर्वोच्च न्यायालयाने परमबीरसिंह यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यासही बजावले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारसह सीबीआयला न्यायालयाने नोटीस बजावली आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी परमबीरसिंह यांच्या वकिलांनी ते भारतातच असल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. त्यांच्या जिवाला धोका असल्याने ते लपून बसल्याचेही वकिलांनी सांगितले. पुढील 48 तासांत सीबीआयसमोर हजर राहण्याची कबुलीही त्यांनी दिली. या प्रकरणी पुढील सुनावणी 6 डिसेंबरला होणार आहे.

Dilip Walse Patil and Param Bir Singh
मुंबईत पाऊल टाकताच परमबीरसिंहांच्या अडचणी वाढल्या!

मे महिन्यात वैद्यकीय सुटीवर गेलेले परमबीरसिंह हे अनेक महिने नॉट रिचेबल होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते गुरूवारी मुंबईत दाखल झाल्याचे समजते. मुंबईत आल्यानंतर एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशीला सामोरे जाण्यासाठी मी आलो आहे. आत्ताच मी काही बोलणार नाही. मी आता न्यायालयातच बोलेन, असं परमबीरसिंह यांनी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

Dilip Walse Patil and Param Bir Singh
कंगना हाजिर हो! विधानसभेसमोर होणार झाडाझडती

परमबीरसिंह यांच्यावर खंडणीचे चार गुन्हे दाखल आहेत. ते परदेशात पळून गेल्याची चर्चा सुरू होती. खंडणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात परमबीरसिंह यांच्यासह विनयसिंह आणि रियाज भाटी यांना मुंबईतील न्यायालयाने फरारी गुन्हेगार घोषित केले. गोरेगाव पोलिसांकडे हा गुन्हा दाखल आहे. हे आरोपी फरार असून, ते सापडत नसल्याने त्यांना फरारी गुन्हेगार घोषित करावे, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. यानुसार न्यायालयाने परमबीरसिंह यांच्यासह तिघांना फरारी गुन्हेगार घोषित केले होते.

Related Stories

No stories found.