कंगनाच्या बांधकामावरील कारवाईत घोळ; उच्च न्यायालयाचे मत

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेने पाडले होते. हा वाद आता उच्च न्यायालयात गेला आहे.
high court resumes hearing on kangana ranaut plea against bmc
high court resumes hearing on kangana ranaut plea against bmc

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. या प्रकरणी कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही कारवाई वेगाने झाली असली तरी ती बेकायदा नाही, असा दावा मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात केला. तर कारवाईमध्ये काहीतरी घोळ दिसतोय, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. दरम्यान, कंगना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामधील सर्व ट्विट दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज कंगनाला दिले आहेत. तसेच, राऊत यांनी दिलेल्या एका मुलाखतीची डीव्हीडीही न्यायालयाने मागविली आहे. 

पाली हिल येथील कंगनाच्या बंगल्यातील बेकायदा बांधकामावर महापालिकेने नोटीस बजावून कारवाई केली होती. याविरोधात तिने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायाधीश शाहरुख काथावाला आणि रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू आहे. सरकारच्या विरोधात ट्विट करून भूमिका मांडली म्हणून ही कारवाई करण्यात आली, असा दावा कंगनाच्या वतीने अॅड. बिरेंद्र सराफ यांनी केला. 

तसेच, राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा काही ऑडियो भागही न्यायालयात दाखल करण्यात आला. यामध्ये कंगनाला राऊत यांनी इशारा दिला आणि हरामखोर असा वादग्रस्त शब्द वापरला, असे सराफ यांनी सांगितले. मात्र, राऊत यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही, असे त्यांच्या वतीने अॅड. प्रदीप थोरात यांनी स्पष्ट केले. यावर त्यांनी हा शब्द याचिकाकर्त्याला वापरला नाही, असे नोंदवून घेऊ का, असा उलट सवाल खंडपीठाने केला. राऊत यांच्या मुलाखतीची वेळ आणि कंगनाचे ट्विट यांची वेळही पहावी लागेल, असे महापालिकेचे विशेष वकील एस्पी चिनौय यांनी सांगितले. त्यामुळे मुलाखतीची संपूर्ण  डीव्हीडी आणि ट्विट दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने कंगनाला दिले आहेत.

मुंबई महापालिकेने कंगनाच्या बंगल्यातील बांधकाम नियमानुसार नसल्याचा दावा पुन्हा एकदा न्यायालयात केला. केवळ विधाने केली म्हणून कारवाई केली, अशी सबब सांगत बसण्यापेक्षा बांधकामावर मुद्दे मांडायला हवेत. विधानांची पळवाट काढून अवैध बांधकामाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे महापालिकेच्या वतीने अॅड. चिनौय यांनी सांगितले. मला खुलासा करायला किंवा बांधकाम नियमित करण्याबाबत आकसाने पर्यायी यंत्रणांचा विचार करायला वेळ दिला नाही, असे कंगनाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, राऊत यांच्या मुलाखतीचा आणि महापालिका कारवाईचा काही संबंध नाही, असा युक्तिवाद महापालिकेच्या वतीने करण्यात आला. 

महापालिकेचे अधिकारी भाग्यवंत लाटे यांनी न्यायालयात कारवाईबाबत माहिती दिली. सर्वसाधारणपणे पोलीस पथक नेले जात नाही परंतु काही प्रकरणात नेतो, असे त्यांनी सांगितले. कंगनाच्या बांधकाम कारवाईचे ( ता. 8 ) छायाचित्रांवर वेळ आणि दिवस स्पष्ट होत नाही. यामुळे या कारवाईमध्ये काहीतरी घोळ आहे, असे खंडपीठाने पालिकेचे प्रमुख वकील अनील साखरे यांना सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com