जोतिरावांनी शिवसमाधी शोधली, सुशोभिकरण केलं आणि शिवजयंती उत्सवही सुरू केला : हरी नरके

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत बोलताना लोकमान टिळकांनी शिवाजी महाराजांची समाधी बांधली, असं वक्तव्य केलं होतं.
जोतिरावांनी शिवसमाधी शोधली, सुशोभिकरण केलं आणि शिवजयंती उत्सवही सुरू केला : हरी नरके
Samadhi of Chhatrapati Shivaji Maharaj, Raigad Fort, Mahatma PhuleSarkarnama

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबाद येथील सभेत बोलताना लोकमान टिळकांनी शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) समाधी बांधली, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासह अन्य काही जणांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. ज्येष्ठ विचारवंच प्रा. हरी नरके (Hari Narke) यांनी जोतिराव फुले (Mahatma Jyotiba Phule) यांनी शिवसमाधी शोधल्याचे आणि सुशोभिकरण केल्याचे दस्ताऐवज उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.

प्रा. नरके यांनी लिहिलेल्या एका लेखामध्ये याबाबत माहिती दिली आहे. शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय सामान्यपणे लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) यांना दिलं जातं. १८९५-९६ साली लोकमान्य टिळक शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभाग दिला. ही महत्त्वाची ऐतिहासिक घटना असल्याचे सांगत नरके म्हणाले, त्याआधी पंधरा वर्ष म्हणजे १८८० साली पुण्याचे महात्मा जोतिराव फुले हे रायगडावर गेल्याचे आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध झाले आहेत.

Samadhi of Chhatrapati Shivaji Maharaj, Raigad Fort, Mahatma Phule
टिळकांनी समाधीसाठी समिती स्थापन केली, पैसे जमवले पण जीर्णोद्धार केला नाही! आव्हाडांचा दावा

महात्मा फुलेंनी शिवाजी महाराज घराघरांत पोहचवले

महात्मा फुले यांनी 1869 मध्ये मराठी मराठी भाषेतील शिवचरित्र (पोवाडा रूपी) लिहून प्रकाशित केले. त्यामाध्यमातून त्यांनी शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. छपाईची सुरूवात झाल्यापासूनचे मराठीतले हे पहिले शिवचरित्र आहे. सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणा सांगताना त्यांनी शिवरायांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यांच्या सगळ्या लेखनात, आणि भाषणांमध्ये शिवरायांचा प्राधान्याने उल्लेख आढळतो. या शिवचरित्राच्या आजवर २५ हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्याची भाषांतरंही विविध भाषांमध्ये झालेली आहेत.

शिवसमाधी शोधली, शिवजयंती उत्सव सुरू केला

महात्मा फुले हे 1880 मध्ये पुण्यातून चालत रायगडावर गेले. तिथे झाडा-झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी जोतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधली. त्याठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली. ही माहिती त्यांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळाली आहे. या सभेत चाफळकर स्वामी, गंगारामभाऊ म्हस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणे झालेली होती. त्याच सभेत शिवजयंची उत्सव सुरू करण्याचा विचार महात्मा फुलेंनी मांडला. त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. एकूण २७ रूपये त्या सभेत जमले. त्यातील तीन रुपये स्वतः जोतिरावांनी दिले होते.

Samadhi of Chhatrapati Shivaji Maharaj, Raigad Fort, Mahatma Phule
राज ठाकरेंना अटक करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

१८८० साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची जोतिरावांनी सुरूवात केली. त्यांचे सहकारी कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत असत. १८९३ साली गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देऊन टिळकांनी त्याचे चळवळीमध्ये रूपांतर केले. त्यांना शिवजयंतीचेही महत्त्व वाटत होते. म्हणूनच पंधरा वर्षे सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात टिळक जातीने उपस्थित राहिले. आणि आपला सहभाग देऊन त्यांनी हा उत्सव आणखी मोठा केला.

सत्यशोधकांनी काढली टिळक-आगरकरांची मिरवणूक

१८८२ साली टिळक-आगरकरांना शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल केलेल्या लेखनासंदर्भात एका खटल्याला सामोरं जावं लागलं. त्यावेळी त्यांना डोंगरीच्या तुरुंगात राहावं लागलं. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेठ बापुशेठ उरवणे यांना रूपये दहा हजार रोख घेऊन जामिनासाठी मुंबईला पाठविलं. आपल्या जामिनासाठी जोतिरावांनी ही धडपड केल्याचे खुद्द टिळक आगरकरांनी 'केसरी'मध्ये नमूद केली आहे. टिळक-आगरकर तुरुंगातून सुटल्यावर सत्यशोधकांनी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली, सत्कार करून मानपत्र दिले. हे मानपत्र 'केसरी'मध्ये छापून आलं. उरवणे यांच्या मृत्युनंतर खुद्द टिळकांनी या आठवणींना उजाळा दिला. (केसरी, ३/१०/१८८२)

पोलिस खात्याचे अहवाल, सत्यशोधक चळवळीचे दस्तावेज, पुरावा लेखागारातील कागदपत्रे आणि सत्यशोधक माधवराव बागल यांनी १९३३ साली सत्यशोधक समाज हिरक महोत्सव ग्रंथात केलेले लेखन, हे सर्व दस्तावेज असे सांगतात की, जोतिरावांनी १८८० साली देशात सर्वप्रथम शिवसमाधी शोधणं, तिचे सुशोभिकरण करणं आणि शिवजयंती उत्सव सुरू करणं, अशी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कामे केलेली आहेत. जामिन आणि मानपत्र याबाबतची नोंद तर खुद्द टिळकांनी केली आहे. तेव्हा आज आपण असे म्हटले पाहीजे की, शिवजयंती सुरू करणारे जोतिराव आहेत आणि ती मोठी करण्यात लोखंडे आणि लोकमान्य टिळक यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.