राज्यपाल कोट्यातून खडसे, शेट्टी आमदार होणार.. पण इतरही चकित करणारी नावे रांगेत! - govt to decides names for MLC from governor quota in cabinet soon | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

राज्यपाल कोट्यातून खडसे, शेट्टी आमदार होणार.. पण इतरही चकित करणारी नावे रांगेत!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, गायक आनंद शिंदे यांचीही वर्णी लागू शकते....

मुंबई : उद्धव ठाकरे सरकार राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नावावर गुरूवारी (ता. 29) होणाऱ्या शिक्कामोर्तब करण्याची शक्यता असून इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. ही बैठक बुधवारी होणार होती. मात्र ती रद्द करून एक दिवस पुढे ढकलण्यात आली. 

साहित्य, कला, समाजसेवा आदी क्षेत्रांतील व्यक्तींची निवड राज्यपाल कोट्यात करण्याचे संकेत आहेत. या कोट्यात बारा सदस्यांची निवड ही मंत्रीमंडळाच्या शिफारशीनंतर केली जाते. महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला यातील किती जागा मिळणार आणि त्या व्यक्ती कोण असणार, याची उत्सुकता आहे. याशिवाय मंत्रीमंडळाने दिलेली शिफारस राज्यपाल स्वीकारणार की फेटाळणार, याचेही औत्सुक्य असणार आहे. या कोट्यासाठी निकष असले तरी गेले काही वर्षे सरसकट राजकीय व्यक्तींना या शिफारशींद्वारे विधान परिषदेत पाठविण्यात येते.

राष्ट्रवादीने या आधीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर पाठविणार असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांचेही नाव निश्चित मानले जात आहे. तसेच संगीतकार-गायक आनंद शिंदे, राष्ट्रवादी महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवती काॅंग्रेसच्या आदिती नलावडे यांच्याही नावाची चर्चा आहे.

 विधानपरिषदेसाठी आम्ही एकनाथराव खडसे यांचे नाव सुचवू शकतो मात्र निर्णय वरिष्ठ नेते घेतील असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांनी व्यक्त केले.

चोपडा येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश हा खडसे व राष्ट्रवादी काँग्रेस दोघांच्या दृष्टीने फायदेशीर आहे. पक्षाचे नेते शरद पवार, अजित पवार यांनी त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय अत्यंत विवेक बुध्दीने घेतला आहे. खडसे यांना विधान परिषदेवर घेण्याबाबतआम्ही पक्षाला सुचवू शकतो. परंतु याबाबत अंतिम निर्णय पक्षाने वरिष्ठ चार जणांची समिती नियुक्त केली आहे. तीच निर्णय घेतील.

शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांच्या नावाचा विचार होणार की नाही, यावर चर्चा आहे. औरंगाबादेतून लोकसभा निवडणूक हरलेले चंद्रकांत खैरे हे राज्यसभेसाठी इच्छुक होते. तेथे त्यांच्या नावाचा विचार झाला नाही. त्यामुळे त्यांच्याही समर्थकांचे डोळे हे आता शिफारशींकडे लागले आहेत. औरंगाबादेत महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने खैरेंना पद द्यावे, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. 

काॅंग्रेसकडून माजी मंत्री नसीम खान, पक्षप्रवक्ते सचिन सावंत, माजी खासादर रजनी पाटील, मुजफ्फरखान यांच्या नावाची शिफारस होण्याची शक्यता आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनाही लाॅटरी लागू शकते, याची चर्चा आहे. मातोंडकर यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक उत्तर मुंबई मतदारसंघातून पक्षाकडून लढवली होती. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख