खडसे, शेट्टी, सावंत यांच्या नावांना राज्यपालांचा अद्याप हिरवा कंदिल नाही...

सरकार आता पुन्हा एकदा शिफारस करून नावे पाठविण्याची शक्यता
खडसे, शेट्टी, सावंत यांच्या नावांना राज्यपालांचा अद्याप हिरवा कंदिल नाही...
governor koshiyari

मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे, राजू शेट्टी, उर्मिला मातोंडकर यांच्या आमदारपदाच्या लाॅटरीची सोडत राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आज संध्याकाळी उशिरापर्यंत काढली नाही. महाविकास आघाडी सरकारने 21 नोव्हेंबरपर्यंत या नावांना मंजूरी द्या, अशी विनंतती राज्यपालांनी केली होती. ती राज्यपालांनी मान्य केल्याचे दिसत नाही. त्यामुळे मंत्रीमंडळापुढे पुन्हा राज्यपालांकडे शिफारस करण्याचा पर्याय असल्याचे सांगण्यात आले.

राज्यपाल कोट्यातून नेमावयाच्या नावांवरून महाआघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. तसेच घडत असल्याचे दिसून येत आहे. राज्यपाल नावांना आक्षेप घेतील, अशी शक्यता सुरवातीला होती. ती गृहित धरून समाजकारण, कला, शिक्षण या क्षेत्राशी सुसंगत अशी नावे राज्यपालांकडे पाठविण्यात आली. ही नावे देतानाच पंधरा दिवसांची मुदत सहा नोव्हेंबर रोजीच्या पत्रात नमूद करण्यात आली होती.

राज्यपालांना अशी मुदत घालता येते का, यावरूनच चर्चा सुरू झाली. राज्यपालांना अशी मुदत देता येत नाही, अशी बाजू भाजपच्या मंडळींनी मांडली. तर राज्यपालांना मंत्रीमंडळाची शिफारस मान्य करण्याशिवाय पर्याय नाही, अशी बाजू महाविकास आघाडीच्या वतीने मांडण्यात आली.

दुसरीकडे सुचविण्यात आलेल्या नावांना काहींनी उच्च न्यायालयात जाऊन आव्हान दिले आहे. एकनाथ खडसे, राजू शेट्टी, सचिन सावंत यांना कलाकार म्हणून कसे काय नेमता येईल, असा मुद्दा यात उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे या साऱ्या गदारोळात राज्यपाल कोट्यातील नियुक्तीला आणखी विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

सरकारच्या या मुदतीलाही भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना आक्षेप घेतला. राज्यपालांना अलिटमेटम देण्याची ही मनोवृत्ती कोणती? कायद्यात वेळेबाबत मर्यादा नाही. राज्यपालांना सन्मान देणार आहात की नाही? अशा अल्टमेटमला कोणी जुमानणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. 

12 सदस्यांमध्ये कोणाची नावे

काँग्रेस

1) सचिन सावंत - सहकार आणि समाजसेवा
2) रजनी पाटील - सहकार आणि समाजसेवा
3) मुजफ्फर हुसैन- समाजसेवा
4) अनिरुद्ध वनकर- कला

राष्ट्रवादी काँग्रेस

1) एकनाथ खडसे- सहकार समाजसेवा
2) राजू शेट्टी - सहकार आणि समाजसेवा
3) यशपाल भिंगे- साहित्य
4) आनंद शिंदे - कला

शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर - कला
2) नितीन बानगुडे पाटील- साहित्य
3) विजय करंजकर - समाजसेवा
4) चंद्रकांत रघुवंशी -समाजसेवा

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in