फडणवीसांनी भेट घेतली अन् दुसऱ्याच दिवशी राज्यपालांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र - governor bhagat singh koshyari writes letter to uddhav thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीसांनी भेट घेतली अन् दुसऱ्याच दिवशी राज्यपालांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 जून 2021

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रामुळे आता खळबळ उडाली आहे. 

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठविलेल्या पत्रामुळे आता खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कळीचा ठरलेला विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा राज्यपालांनी पत्रात (Governor Letter) उपस्थित केला आहे. याचबरोबर राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन जादा कालावधीसाठी घेण्याची सूचनाही केली आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने 23 जूनला राज्यपालांची भेट घेतली होती. यात त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. यावर राज्यपालांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 24 जूनला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी तीन प्रमुख मुद्दे मांडले आहेत. हे तिन्ही मुद्दे सरकारला सध्या अडचणीचे ठरणारे आहेत. 

1) विधिमंडळाचे अधिवेशन जादा कालावधीसाठी घेणे. 
2) विधानसभा अध्यक्षांचे संविधानिक पद तातडीने भरण्याबाबत कार्यवाही करणे. 
3) राज्यातील ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक सद्यस्थितीत ने घेणे. 

विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा कायम 
महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला आलेले आहे. नाना पटोले यांनी राजीनामा दिला आणि ते प्रदेशाध्यक्ष बनले, तेव्हापासून अध्यक्षपदाचे भिजत घोंगडे कायम आहे. हा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून काँग्रेसला तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हेही वाचा : हाय कमांडने सिद्धूला झुकते माप देऊन अमरिंदरसिंगांंना डावललं

विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, सुरेश वरपुडकर आणि संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा आहे. संग्राम थोपटे यांना सरकार स्थापनेच्या वेळी मंत्रिपद द्यायचं जवळपास निश्‍चित झालं होतं. पण ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे आता त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे आणि त्यांच्या समर्थकांनाही या वेळी त्यांची अध्यक्षपदासाठी निवड होईल, असा ठाम विश्‍वास आहे. 

दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत धुसफुस सुरू असल्याची टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे. या निवडणुकीबाबत निर्णय घेताना तिन्ही पक्षांना याचाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र बसून यावर तोडगा काढतील, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख