ठाकरेंचा आणखी एक कट्टर शिवसैनिक शिंदे गटात; कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेसमोर आव्हान

Shivsena | Eknath Shinde | Uddhav Thackeray : कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama

डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवकांनंतर शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निष्ठावंत आणि कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे (Gopal Landge) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. कट्टर शिवसैनिक मानले जाणाऱ्या लांडगे यांनी शिवसेनेतील आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे यांच्यामागे आपली ताकद उभी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. यामुळे कल्याण पूर्व विधानसभा आणि कल्याण ग्रामीण भागात शिंदे समर्थकांची ताकद वाढली असल्याची चर्चा आहे.

कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. डोंबिवलीचे शहरप्रमुख राजेश मोरे, युवासेना जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे हे देखील त्यावेळी उपस्थित होते. कल्याण ग्रामीण भागातून मात्र शिंदे समर्थकांना आत्तापर्यंत कोणीही उघड पाठिंबा दिलेला नव्हता. ग्रामीण भागातील नगरसेवक ही लवकरच मुख्यमंत्री शिंदे यांना पाठींबा देतील असे विधान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले होते.

दरम्यान खासदार शिंदे यांचे हे विधान खरे ठरत असून कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी आपल्या पदाचा त्याग करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण प्रमाण मानून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. लांडगे यांच्या पाठिंब्यामुळे कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र व ग्रामीण भागात शिंदे समर्थक गटाची ताकद वाढली असून सेनला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली होती. मात्र अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला होता. भाजपाकडे सध्या हा मतदार संघ असला तरी सेनेची ताकद देखील या मतदार संघात आहे. आता भाजपा आणि शिंदे समर्थकांची ताकद येथे वाढल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे.

कल्याण डोंबिवलीचे माजी नगरसेवक राजेश मोरे, विशाल पावशे, प्रशांत काळे, दीपेश म्हात्रे यांसह 40 हुन अधिक माजी नगरसेवकानी मुख्यमंत्री शिंदे यांना आपला पाठींबा दर्शवला आहे. तर उल्हासनगरचे माजी नगरसेवक कलवंत सिंह आणि माजी नगरसेवक अरुण आशन यांनी देखील शिंदे यांना आपला पाठींबा दर्शवला आहे. कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले गोपाळ लांडगे यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना पाठींबा दिल्याने कल्याण डोंबिवलीमधील शिंदे समर्थकांची ताकद वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in