'गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम' उत्साहात : शिंदे सरकारने सर्व सणांवरील निर्बंध हटविले

Eknath Shinde | Devendra Fadnavis : कोणत्याही सणांना कसल्याही प्रकारच्या क्लिष्ट अटी न ठेवण्याच्या सुचना
Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News
Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News Sarkarnama

मुंबई : राज्यातील 'गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम' असे सर्व सण यंदा कोणत्याही निर्बंधाविना साजरे होणार आहेत. मागील दोन वर्षांपासून या सणांवर असलेले सर्व निर्बंध हटविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पत्रकार परिषदेत केली. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, यंदा कोणत्याही सणांना कसल्याही प्रकारच्या क्लिष्ट अटी न ठेवण्याच्या सुचना सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाला दिल्या असून कोणत्याही नियमांचा बागुलबूवा करु नये, असेही स्पष्ट निर्देश दिले असल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील २ वर्ष कोरोनामुळे इच्छा असूनही आपल्याला सण साजरे करता आले नाहीत, पण यंदा असे होणार नाही. आज गणेशोत्सव आणि इतर सणांसंबंधित समन्वय समितीची एक बैठक झाली. यात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांचा तसेच मूर्तीकारांपासून ते गणेशोत्सव आणि दहीहंडी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

या बैठकीत गणेशोत्सव, दहीहंडी या सगळ्याबाबत चर्चा झाली. बैठकीत प्रत्येकाने काही सुचना दिल्या. त्यानुसार यंदाचे सण कोणत्याही निर्बंधाशिवाय धुमधडक्यात साजरे करण्यास परवानगी देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. मात्र सर्व सणांदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेला कुठेही धक्का लागणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

बैठकीत देण्यात आलेले प्रमुख निर्देश

  • कायदा आणि सुव्यवस्थेला कुठेही धक्का लागणार नाही, याची काळजी घेण्याबाबत पोलिस प्रशासनाला योग्य ते निर्देश

  • सणांदरम्यान ज्यादा एसटी गाड्या सोडण्याचे परिवहन विभागाला निर्देश

  • येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा दोन्ही बाजूचे खड्डे दुरुस्त करण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचना

  • महामार्गावर ट्राफिक जाम होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी वाहतूक पोलिसांना आदेश

बैठकीत घेण्यात आलेले प्रमुख निर्णय

  • गणेश मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध हटवले.

  • मूर्तीकारांना मूर्ती बनविण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार

  • मिरवणूकांवर निर्बंध नाहीत.

  • गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना सर्वांना टोल माफी.

  • कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांवरील साध्या स्वरुपाचे गुन्हे मागे घेणार.

  • गोविंदाच्याबाबतीत न्यायालयाने घालून दिलेले सर्व नियम पाळणे बंधनकारक. सरकारचे नवीन निर्बंध नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in