अर्णब गोस्वामींनी केली महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण - fir against arnab goswami for assaulting lady police officer | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णब गोस्वामींनी केली महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण

वृत्तसंस्था
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांनी महिला पोलिसाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

मुंबई :  रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. यामुळे अलिबाग जिल्हा न्यायालयाने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, गोस्वामी यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे गोस्वामी यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. 

गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी मारहाण केल्याचा दावा गोस्वामी न्यायायलात केला. त्यामुळे न्यायालयाने गोस्वामी यांची अलिबागमधील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश दिला. भाजपच्या अनेक नेत्यांना गोस्वामींवरील कारवाईवरुन महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. 

न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलतानाही गोस्वामी यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. त्यांनी शरीरावरील मारहाणीच्या खुणाही प्रसारमाध्यमांसमोर दाखवल्या.  या वेळी गोस्वामी हे अनवाणीच होते. पोलिसांनी मला येथे अनवाणीच आणले, असा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले की, पोलिसांनी मला घेरले आणि माझी मान पकडली. त्यांनी मला ढकलले. मला मारहाण करण्यात आली. पोलिसांना मला अनवाणीच आणले आहे. 

गोस्वामी यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकातील महिला पोलीस अधिकाऱ्याला त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे गोस्वामी यांच्यासमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली.  २०१८ मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

त्यावेळी पोलिसांना अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख