
मुंबई : ''भोंगा हा फक्त दंगल माजविण्यासाठी निर्माण झालेला आहे. भोंग्याच्या मागून कोण बोलतंय, हे सर्वांना कळतंय त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व न देता नोकऱ्या किती गेल्या याचे मोजमाप आहे का? याकडे लक्ष द्या,'' असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. (Jitendra Awhad on Loudspeaker Issue)
''सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य झालाच पाहिजे. समाज व धर्म कोणताही असो सर्वोच्च न्यायालय सुप्रीम आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्वांना ऐकावेच लागतील'' असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. महागाई किती वाढलीये याबद्दल कुणी बोलत नाही. पेट्रोलचे दर १२५ रुपयांवर गेलेत, त्याबद्दल कुणी बोलत नाही. २०१४ रोजी पेट्रोलचा दर ७१ रुपये होता. 'त्यावेळी ४१० रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आज हजाराच्यावर आहे. पेट्रोल-डिझेल-सीएनजी महाग झाल्यामुळे दळणवळण महाग होतं त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्याच्या किंमती वाढतात,'' असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
''आता लोकांनीच समजून घ्यायला हवे. उद्या घराच्याबाहेर सामान्य लोकांची मुलं जाणार आहेत. धर्म कोणताही असो पण दगडाला दगड लागून त्यातून अग्नी निर्माण होतो. त्या अग्नीत कोणत्याही नेत्याचं मुल जळणार नाही, पण तुरुंगात मात्र सामान्य माणसाची मुलं खितपत पडतील.'' या देशातील तरुणांना दंगलीच्या वाटेवर नेऊन सामान्य माणसांना देशोधडीला लावायचे हा प्रकार मला तरी अमान्य असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
''आज सकाळी वर्तमानपत्र वाचत असताना निदर्शनास आले की, भारतात केवळ आठ दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आहे. हे काय दर्शविते? आज जर आपण कोळसा व्यवस्थित जमवला नाही. तर हा देश कमीत कमी १४ तास अंधारात राहिल. श्रीलंकेची महागाई आणि आपल्या महागाईत केवळ १७ टक्क्याचा फरक आहे.''
''या देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर पुढच्या काळात आपली श्रीलंका होणार नाही, याची काळजी सर्व पक्षांनी, धर्मांनी, माणसांनी घेतली पाहिजे. आता हिंस्र श्वापदे जर तुमच्या अंगात येत असतील तर कुणीच काही करु शकत नाही,'' असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशाच्या महागाईबाबत बोलताना संतापजनक प्रतिक्रिया दिली. याचाही समाचार जितेंद्र आव्हाड यांनी घेतला. ''हे लोक बेफिकीरी दाखवतायत, याचे कारण जर आपण धर्माचा द्वेष पसरवला तर आपण काहीही करु शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. २०१४ रोजी ७१ रुपये प्रतिलिटर असलेले पेट्रोल आज सव्वाशे रुपयांवर आलेले असताना अर्थमंत्री बोलणार नसतील तर आपण काय बोलणार,'' असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.