
मुंबई - मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मैदान ( बीकेसी ग्राऊंड ) येथे आज शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियानाची जाहीर सभा होत आहे. या सभेत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी भाजप नेते व राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली. ( Eknath Shinde said, we don't have Hindutva that causes quarrels among ourselves ... )
एकनाथ शिंदे म्हणाले की, आपले प्रखर हिंदुत्व दाखविण्यासाठी सभेला शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली आहे. ही गर्दी जमवलेली नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेमाने कमावलेली गर्दी आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस व नंतर हिंदूंवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न केले. 'गर्वसे कहो हम हिंदू है' हा नारा त्यांनी दिला. अनेक जण सोयीप्रमाणे शब्द फिरवितात. असला भ्याडपणा त्यांनी कधी केला नाही. हा त्यांचा ठाकरी बाणा होता, असा टोला ही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.
ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान व त्यांनी जन्माला घातलेल्या दहशतवादी संघटना केवळ बाळासाहेब ठाकरे यांना घाबरत. त्यामुळे ते नेहमीच अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर होते. त्यांनी अंगावर आलेल्यांना शिंगावर घेण्याचे काम केले. अयोद्धेतील कारसेवेच्या वेळी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना कारसेवा करण्यास सांगितले होते. मला आठवते, ठाण्यात कार सेवा सुरू असताना आनंद दिघे यांनी चांदीची विट दिली होती. बाबरी पडली त्यावेळी बाळासाहेबांनीच अभिमानाने सांगितले होते, ती शिवसैनिकाने पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे. त्यामुळे दाऊदने मुंबईत बॉम्ब स्फोट केले. मुंबई दंगलीत पेटल्यावर बाळासाहेबांनीच मुंबईला वाचविले. त्यांनी हिंदुत्वासाठी कधी परिणामांची परवा केली नाही. तोच वारसा उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे चालवित आहेत.
नव हिंदूंना हिंदुत्व ही राजकीय फायद्यासाठी वापरायची गोष्ट वाटते. अयोद्धेचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कधी अयोद्ध्या व हिंदुत्वाचा वापर राजकीय फायद्यासाठी केला नाही. आपापसात भांडणे लावणारे आमचे हिंदुत्व नाही. इडापिडा मागे लागली म्हणून शिवसेना घाबरली नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. हिंदुत्व हे येड्या गबाळ्याचे काम नाही. शिवसेनेचा नाद करायचा नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी विरोधकांना दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.